बीड जिह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मीक कराड याला पुण्यात राहण्यास कोणी साथ दिली, कोणी मदत केली, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पुणे पोलिसांकडे करण्यात आली आहे.
वाल्मीक कराड हा मागील 22 दिवस पोलिसांना गुंगारा देत फिरत होता. तो मागील बरेच दिवस पुण्यात असल्याचे त्याच्यासोबत असलेल्या बीडच्या नगरसेवकाने दिलेल्या माहितीवरून सिद्ध झाले आहे. याचा अर्थ वाल्मीक कराड हा पुण्यात वास्तव्यास होता. त्यामुळे पुण्यात त्याला कोणी मदत केली, याची सखोल चौकशी व्हावी आणि मदत करणाऱ्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी पुणे शहर प्रमुख संजय मोरे, उपशहर प्रमुख आबा निकम, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवासेना समन्वयक युवराज पारीख, संघटक अजय परदेशी, उपविभाग प्रमुख अनिल परदेशी, सुरेश घाडगे, संजय साळवी उपस्थित होते.