धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव, दिल्लीत अजित पवार अमित शहांना भेटले

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. याप्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्हय़ात मंत्री धनंजय मुंडे यांचा खास वाल्मीक कराडला अटक झाली असून मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षाबरोबर सत्ताधारी भाजपकडून दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत नेमके काय घडले याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शहा यांच्या भेटीमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत काही चर्चा झाली का याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अजित पवार गटाला केंद्रात एकही मंत्रिपद मिळालेले नाही. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यात आपल्या गटाला एक मंत्रीपद मिळावे असा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे. तसेच दिल्ली विधानसभा निवडणूक लढण्याची तयारीही अजित पवार यांच्या पक्षाकडून केली जात आहे. या अनुषंगाने या भेटीत चर्चा झाली असावी अशी शक्यता आहे.

कराडने बँकेला धमकावून घेतली 2 कोटींची डिफेंडर!

वाल्मीक कराड याच्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज नवा आरोप केला. ज्या बँका आणि पतपेढय़ा बुडाल्या त्यातही वाल्मीक कराडचा हात आहे. एका को-ऑपरेटिव्ह बँकेतील अधिकाऱयांना दमदाटी करून कराडने 2 कोटींची डिफेंडर घेतली, असे धस म्हणाले.

खंडणीखोरांवर कारवाई करा; पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून राज्यात वाढलेल्या खंडणीखोरीवर चिंता व्यक्त केली. संतोष देशमुख हत्येनंतर जनतेमध्ये संताप आहे. आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्यासाठी तपासाबाबत आदेश द्यावेत. बीडसह राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या कंपन्या आणि उद्योगांकडून खंडणी मागणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी पवारांनी केली.