वाल्मीक कराडच्या दिमतीला असलेली एसयूव्ही कुणाची?

खंडणी प्रकरणात शरण आलेला वाल्मीक कराड हा आलिशान स्कॉर्पियो गाडीतून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात आला. एम.एच. 23 बीजे 2231 क्रमांकाची ही गाडी परळी येथील अजित शिवलिंग मोराळे यांची असून शिवलिंग मोराळे हे शासकीय कंत्राटदार आहेत. मोराळे बापलेक धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक आहेत.

हे तर सीआयडीचे अपयश

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याच्यावर आरोप केले जात आहेत. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असून तो 10 डिसेंबरपासून फरार होता. 22 दिवसांनंतर पुण्यात सीआयडीच्या कार्यालयात तो शरण आला. वाल्मीक कराडची शरणागती हे सीआयडीचे अपयश असल्याची संतप्त प्रतिक्रिया आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली. अजूनही हत्येतील प्रमुख गुन्हेगार मोकाट आहेत. त्यांना अटक झालेली नाही. वाल्मीक कराड इतके दिवस कुठे होते, याचा तपासही सीआयडीने करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड शरण आला असला तरी त्याच्यावर कलम 302 प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि संपूर्ण चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसेल तर वाल्मीक कराड फरार का होता, असा सवालही त्यांनी केला. आमदार क्षीरसागर यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पुरावे नष्ट केल्यानंतर शरण

खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 22 दिवस पोलीस-सीआयडी वाल्मीक कराडला पकडू शकले नाहीत. इतकेच नाही तर, आज सरेंडर होताना हा कराड स्वतःच्या गाडीतून येतो. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. शरण येण्यापूर्वी वाल्मीक व्हिडीओ रिलीज करतो आणि स्वतःला क्लीन चिट देतो, यातून त्याच्या मागे खूप मोठी शक्ती असल्याचे स्पष्ट आहे, असा आरोपही त्यांनी केला.

पोलिसांनीच वाल्मीकला मदत केली

केज पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनीच वाल्मीकला मदत केली, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. वाल्मीक कराडला खंडणीच्या गुह्यात टाकले, अजून 302 चा आरोपी केलेले नाही. खंडणीच्या गुह्यात जास्तीत जास्त तीन महिने, जामीन तर होणारच, ही प्लॅन स्ट्रटेजी होती, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. वाल्मीक पुण्यात हजर होतो, त्याअर्थी तो पुण्याच्या आसपास आहे. नवीन नवीन गॅझेट आलीत तरी पोलिसांना त्याला शोधता आले नाही. त्याच्याबरोबर कोण आहेत हेसुद्धा त्यांना समजले नाही, याबद्दल आव्हाड यांनी आश्चर्य व्यक्त केले.