संतोष देशमुख हत्याकांडाची पुढील सुनावणी 26 मार्चला, आरोपींच्या वकिलांची कागदपत्रे देण्याची मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर बुधवारी केज न्यायालयात सुनावणीला प्रारंभ झाला. सुरक्षेच्या कारणास्तव या प्रकरणातील आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आले.  आरोपींच्या वकिलांनी आरोपपत्र मिळाले नसल्याचे सांगून सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करून पुढील सुनावणी 26 मार्च रोजी ठेवली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अमानुष हत्या करण्यात आली. या प्रकरणी सीआयडी तसेच एसआयटीने वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे या आठ जणांवर ‘मकोका’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गेल्याच महिन्यात तपास यंत्रणांनी 1400 पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात सादर केले. यात संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड हा वाल्मीक कराडच असल्याचे स्पष्ट म्हटले आहे.

फरार कृष्णा आंधळे नाशकात दिसल्याचा दावा

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमधील गंगापूर रोडवर दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी गंगापूर रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.  नाशिकमधील गंगापूर रोडवर एका झाडाखाली कृष्णा आंधळे उभा होता. त्याने तोंडाला मास्क लावलेला होता. कपाळावर गंध होते. नजरानजर होताच कावराबावरा होत तो गाडीवरून पसार झाल्याचे स्थानिक नागरिकाने पोलिसांना सांगितले.