Santosh Deshmukh Case – कोणाला सोडणार नाही म्हणतात, अगोदर आरोपी धरा तर! अंबादास दानवेंचा फडणवीसांना टोला

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज एक महिना पूर्ण झाला. महिनाभरापूर्वी त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरण पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना ताब्यात घेतले असून कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी अद्यापही फरार आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

अंबादास दानवे यांनी गुरुवारी सकाळी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ‘सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना उलटला तरी केवळ 23 वर्षे वयाचा एक पोऱ्या, कृष्णा आंधळे हा सहावा आरोपी पोलिसांच्या हाती तुरी देतोय. दुसरीकडे जनभावनेचा आदर म्हणून सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला तयार नाही. किती हा निगरगट्टपणा. ‘निगरगट्ट’ शब्द पण लाजवला यांनी आता तर! सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही कोणाला सोडणार नाही.. महोदय, सोडणे वगैरे नंतर, अगोदर आरोपी धरा तर, असे ट्विट अंबादास दानवे यांनी केले आहे.