कळंबची मनीषा बिडवे हिच्या हत्येने संतोष देशमुख प्रकरण पुन्हा चर्चेत

संतोष देशमुख यांच्यावर अनैतिक संबंधाचा आरोप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कळंबच्या ‘छोटी आका’ मनीषा बिडवे या महिलेची हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. मात्र अनैतिक संबंधातून तिची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेल्या हत्येमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

केज रोडवरील आलिशान द्वारकानगरी येथे मनीषा बिडवे ही महिला राहत होती. बीड जिह्यातील आडस हे तिचे मूळ गाव आहे. द्वारकानगरी येथील घरातून दुर्गंधी येऊ लागल्याची माहिती नागरिकांनी कळंब पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराची पाहणी केली असता, महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला.

हत्या संपेनात – दमानिया

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ट्विट करताना म्हणाल्या की, गुंड संपता संपत नाहीत आणि हत्याही संपता संपत नाहीत. या महिलेची 7 ते 8 दिवसांपूर्वी हत्या झाल्याची माहिती आहे. मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधांतून झाल्याचे दाखवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कळंबच्या महिलेची हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप दमानिया यांनी केला आहे.

अनैतिक संबंधातून हत्या

कळंब शहरातील द्वारकानगरीत मृत अवस्थेत सापडलेली महिला मनीषा बिडवे हिचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही संबंध नसून, अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी सांगितले. डोक्यात जबर मार लागल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. यातील आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झालेली आहेत. आरोपी पकडल्यानंतर हा खून कशासाठी झाला आहे याचा उलगडा होईल, असे ते म्हणाले.