Santosh Deshmukh Case – संपूर्ण घटनेला वाल्मिक कराडने गाईड केलं, सुदर्शन घुले गँग लीडर; विशेष सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे. हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपल्या युक्तीवादातून संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम कोर्टात मांडला. या प्रकरणात वाल्मिक कराड मास्टरमाईंड तर, सुदर्शन घुले गँग लीडर आहे, असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी कोर्टात केला. आजची सुनावणी संपली असून पुढील सुनावणी ही 10 एप्रिलला होणार आहे.

बीड जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणीपूर्वी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे न्यायालयापुढे सादर केली. 1 डिंसेबरला नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगामध्ये वाल्मिक कराडसह आरोपींची बैठक झाली. संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड याने मार्गदर्शन केले. सीडीआर रिपोर्टमधून ही माहिती बाहेर झाली. यामध्ये गँग लीडर हा सुदर्शन घुले आहे. त्याला वाल्मिक कराड यानेच गाईड केले. सीडीआरमधून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांना तीन वेळा फोन केला. सुरवातीला आवादा कंपनीच्या सुरक्षारक्षकाला सुदर्शन घुलेने मारहाण केली, असे सुनावणीदरम्यान उज्जवल निकम म्हणाले.

Santosh Deshmukh Case – अशी वेळ इतर कुणावरही येऊ नये, यात कुणाचा हात आहे त्याला शिक्षा दिली पाहिजे, वैभवी देशमुखची सरकारकडे मागणी

ही केस चार्ज फ्रेम करण्यासाठी तयार असल्याचे उज्वल निकम यांनी कोर्टात सांगितले. पण आरोपीच्या वकिलाने त्यांना कागदपत्रे न मिळाल्यामुळे चार्ज फ्रेम न करण्याची मागणी केली. आरोपींच्या वकिलांनी कागदपत्रांची मागणी केली. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी मागवलेली गोपनीय कागदपत्रे त्यांना देण्यात आली आहेत. जवळ जवळ सहाशे पाने कागदपत्रे देण्यात आली. या प्रकरणी पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे.