
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यात यावे, या मागणीसाठी धाराशीवकरांनी कडकडीत बंद पाळला. धाराशीव शहरासह परंडा, तुळजापूर, कळंब, ईट, भूम, येरमाळा येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संतोष देशमुख यांच्यावर कराड गँगने केलेल्या अत्याचारांचे पह्टो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाचा आगडोंब उसळला आहे. देशमुखांच्या मारेकऱ्यांचा ‘आका’ वाल्मीक कराड आणि ‘आकाचे आका’ धनंजय मुंडे यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. राक्षसांना फासावर लटकवा अशी मागणी होत असून लातूर जिह्यातील शिरूर अनंतपाळ आणि परभणी जिह्यातील गंगाखेड येथे उद्या बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
बीडमधील लिंबागणेश येथेही उत्स्फूर्त बंद होता. लातूर जिह्यात शिरूर अनंतपाळ येथे बंद पुकारण्यात आला होता. निलंगा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या पुतळय़ांचे दहन करण्यात आले. लातुरात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. परभणी जिह्यातील बोरी येथेही बंदचे आवाहन करण्यात आले होते. जालना जिह्यातील जाफराबाद, राजूरलाही कडकडीत बंद होता.
मुंडेंच्या घरासमोर ‘जोडे मारो’
धनंजय मुंडे यांच्यावर पुण्यातील घरापुढे आज त्यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. मुंडे यांना आमदारपदावरून बडतर्फ करा. त्यांना सहआरोपी करून खटला चालवा, अशी मागणी महिलांनी केली.
कराडची मालमत्ता जप्त करणार
‘घरगडी ते अण्णा’ असा प्रवास करणाऱ्या वाल्मीक कराडचे पाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी खोलात गेले आहेत. एसआयटीने दोषारोपपत्रासोबतच वाल्मीकच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. यात वाल्मीकच्या कोटय़वधींच्या महागडय़ा गाडय़ांचा समावेश आहे. कराडकडे आलिशान गाडय़ांची रांगच आहे. पर्ह्ड इंडेव्हर, अशोक लेलँड, जग्वार लँड रोव्हर, जेसीबी इंडिया, मर्सिडिझ बेन्झ, बीएमडब्ल्यू, टोयाटो इनोव्हा या कोटय़वधी रुपये किमतीच्या गाडय़ा वाल्मीककडे कोठून आल्या, याचा शोध एसआयटीला घ्यायचा आहे.
n वाल्मीक कराड हा अनेक मोबाईल फोन वापरत होता. त्यापैकी महत्त्वाच्या तीन आयफोनमधील डेटा त्याने उडवला असल्याचे तपासात समोर आले आहे. हे तीनही मोबाईल न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे.