
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे जवळचे वाल्मीक कराड सूत्रधार असल्याचे सीआयडीने आरोपपत्रात म्हटले. त्यानंतर संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करतानाचे फोटोही समोर आले. यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला होता. अखेर मंगळवारी त्यांनी वैद्यकीय कारणांचा हवाला देत राजीनामा दिला. मात्र त्यांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नसून या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहकाआरोपी करावे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा मंत्री पदाचा राजीनामा दिला असला तरी त्याने प्रश्न सुटणार नाही. या प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो, विजय वडेट्टीवार यांचा आरोप
बीड इथे अनेक गुन्हे घडले आहेत, खंडणी, खुनाच्या घटना घडल्या आहेत. मुंडे यांना सहआरोपी केल्यावर अशा अनेक गुन्ह्यांचा उलगडा होईल. महाराष्ट्र आता बिहारच्या पुढे गेला का, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई कधी?
आमदार अबू आझमी यांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे होते. अबू आझमी यांच्यावर सरकारने कारवाई करावी, त्याला आमचे समर्थन आहे. राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, यांच्यावर सरकार का कारवाई करत नाही? यांना कोणाचा राजाश्रय आहे असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कोणीही केला तर कारवाई झालीच पाहिजे, ही मागणी वडेट्टीवार यांनी केली.