बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेचे सामाजिक आणि राजकिय पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. तसेच सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला. या प्रकरणातील संशयीत आरोपी वाल्मीक कराड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेला एक महिना होऊन गेला आहे. परंतु अजूनही काही आरोपी हे मोकाटच आहेत. आरोपी पकडले जात नसतील तर आम्हाला न्याय कसा मिळणार? असा सवाल संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने सरकारला केला आहे.
संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये “जन आक्रोश मोर्चा”चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. तसेच धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार वाल्मीक कराडला फाशी द्या, गृहमंत्री साहेब बीड चा बिहार होऊ देणार का? अशा आशायचे पोस्टर्स यावेळी संतप्त नागरिकांनी झळकावले. या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख हे सुद्दा सहभागी झाले होते.
“आम्ही न्याय मागत आहोत हीच आमची मागणी आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या वडिलांची हत्या होऊन महिना झाला, तरीही आरोपी पकडले जात नसतील तर आम्हाला न्याय कसा मिळणार? माझी सरकारला विनंती आहे की, जे कोणी आरोपींची मदत करत असतील, तर त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी केलं पाहिजे. आम्ही आज न्याय मागत आहोत, आम्हाला न्याय द्या हीच आमची मागणी आहे. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे.” असं वैभवी देशमुख म्हणली.
“आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आम्ही मोर्चात सहभागी झालो आहोत. तसेच आरोपींना फाशी झाली पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे. न्याय कुठल्या पद्धतीने द्यायचा तो सरकारचा प्रश्न आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांची लवकरच आम्ही भेट घेणार आहोत किंवा ते आमची भेट घेतली, असे यावेळी धनंजय देशमुख म्हणाले.