Santosh Deshmukh Case – सीआयडी बिनकामाची, 15 दिवस नुसत्या चौकश्या, फडणवीस-मुंडेंच्या मैत्रीचा तपासावर परिणाम

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीचा 15 दिवस तमाशाच चाललाय. सीआयडीचा तपास चौकश्यांवर रेंगाळला आहे. आरोपी सीआयडीला बोटावर खेळवत आहेत. तर मास्टरमाइंड वाल्मीक कराड देवदर्शनात मग्न आहे!

पवनचक्कीच्या वादातून मस्साजोगचे सरपंच तसेच भाजपचे पदाधिकारी संतोष देशमुख यांची अतिशय अमानुषपणे हत्या करण्यात आली. या हत्येला आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. स्थानिक पोलीस वाल्मीक कराडांची गुलामी करत असल्यामुळे हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. सीआयडीचे अपर महासंचालक तपासासाठी बीडमध्ये तळ ठोकून बसले. सीआयडीकडे तपास येण्याअगोदर स्थानिक पोलिसांनी या प्रकरणातील विष्णू चाटेसह इतर आरोपींना बेड्या ठोकल्या. मात्र सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघेजण अजूनही सापडले नाहीत. अवघ्या विशीत असलेल्या या आरोपींनी तपास यंत्रणांचा खुळखुळा केला आहे. देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयडीने आतापर्यंत शंभर जणांना बोलावले. परंतु या चौकशीतून काहीही निष्पन्न झाले नाही. आरोपींच्या कुटुंबियाकडे विचारपूस करून झाली, पण हे आरोपी काही हाती लागले नाहीत. आता दोन मोबाईल हाती लागले असून कोणत्या बडय़ा नेत्याला या मोबाईलमधून कॉल करण्यात आले याचा धांडोळा घेण्यात येत आहे. एवढे दिवस सीडीआर का तपासले गेले नाहीत? या प्रश्नाला तपास यंत्रणांकडे कोणतेही उत्तर नाही.

बँक खाती गोठवून काय झाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींची बँक खाती गोठवण्याचे आदेश दिले. हे आदेश येण्यापूर्वीच आरोपींची बँक खाती रिकामी झाली होती. आपली बँक खाती गोठवण्यात येणार हे अगोदरच आरोपींना कळले होते. त्यामुळे जुजबी रक्कम ठेवून आरोपींनी पैसे काढून घेतले. बँक व्यवहाराचे हे तपशील तपासले असते तर नक्कीच आरोपी सापडले असते. परंतु सीआयडीच्या नऊ पथकांनी नेमकी कुठे आणि काय चौकशी केली हे कळायला मार्ग नाही.

फडणवीस-मुंडेंच्या मैत्रीचा तपासावर परिणाम

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत असल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची गाढ मैत्री आहे. धनंजय मुंडे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत केल्यानंतरही या मैत्रीत खंड पडला नाही. या मैत्रीच्या प्रभावामुळेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास रखडला असल्याचेही आता बोलले जात आहे.

परळीत कशाला, अंबाजोगाईत राहू! ‘आका’च्या दहशतीने स्थलांतर वाढले

वाल्मीक कराडला सहआरोपी करा, देशमुख कुटुंब उच्च न्यायालयात

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करून नवनीत काँवत यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच या खुनाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. 26 तारखेला सीआयडीने तपास हाती घेतला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेऊन खंडणीच्या गुन्हय़ात फरार असलेल्या वाल्मीक कराडला सहआरोपी करा अशी मागणी केली आहे.

‘मकोका’च्या नुसत्याच वाफा

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार या आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात या प्रकरणातील सर्व आरोपींना ‘मकोका’ लावण्याची घोषणा केली होती. अटक करण्यात आलेले आरोपी पोलीस कोठडीत मजेत आहेत आणि फरार असलेले राजकीय संरक्षणात मजा करत आहेत. ‘मकोका’ लावण्याच्या नुसत्याच वाफा सोडण्यात आल्या. त्यामुळे मुख्यमंत्री आणि ते सांभाळत असलेल्या गृहखात्याच्या हेतूबद्दलही शंका निर्माण झाली आहे.

बीडकरांच्या भावनांना सरकार दरबारी किंमत नाही

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा, त्यांचे आश्रयदाते धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हाकला, या मागणीसाठी बीडकरांनी विराट मोर्चा काढला. सर्वपक्षीय मोर्चाच्या माध्यमातून प्रचंड आक्रोश व्यक्त झाला. पण सरकारने या मोर्चाला, बीडकरांच्या भावनांना कवडीचीही किंमत दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एका निष्पाप जीवाचे मोल लावून गुंडगिरीला पाठीशी घालण्यात येत असल्याची खंत बीडकर बोलून दाखवत आहेत.

मला वाचवा! धनंजय मुंडेंनी घेतली फडणवीसांची भेट

माझ्या विधानाचा गैरअर्थ, मी प्राजक्ताताईंची दिलगिरी व्यक्त करतो

प्राजक्ता माळी यांच्यासंदर्भात मी केलेल्या विधानाचा गैरअर्थ काढण्यात आला. कोणाचाही अपमान करण्याचा आपला हेतू नव्हता, कुणाच्या चारित्र्याबद्दलही आपल्याला बोलायचे नव्हते. सर्व स्त्रीयांचा मी आदर करतो. माझ्या विधानामुळे कुणाचे मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे आमदार सुरेश धस म्हणाले.

वाल्मीक कराड देवदर्शन करतो, फोटोही टाकतो…

संतोष देशमुख हत्येतील मास्टरमाइंड वाल्मीक कराड हा 11 डिसेंबरपर्यंत उज्जैन येथे होता. महाकालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर त्याने सोशल मीडियावर फोटोही शेअर केला. 13 डिसेंबरपर्यंत त्याचा मोबाईल चालू होता. त्यानंतर तो नागपुरात एका फार्महाऊसवर होता. तेथून तो तिरुपतीला गेला आणि त्यानंतर आता पुण्यात असल्याचे बोलले जात आहे.