दोन आठवडे वाल्मीक पुण्यात अन् सीआयडीला थांगपत्ता नाही! मालमत्ता देवाणघेवाणीसाठी वेळ दिला का?

‘सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 23 दिवस उलटून गेले. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या शोधासाठी सीआयडीने नऊ पथके तयार केली. या पथकांच्या नाकावर टिच्चून वाल्मीक कराड दोन आठवडे पुण्यात पाहुणचार घेत होता. किती गंमतीदार आहे हे सगळे…’ अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शरणागतीच्या नाटकावर आपला संताप व्यक्त केला.

वाल्मीक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अंजली दमानिया यांनी एकूणच या साऱ्या प्रकारावर कडाडून टीका केली. 17 डिसेंबरपासून वाल्मीक कराड हा पुण्यात शाही पाहुणचार घेत होता. पोलिसांना या पाहुणचाराची खबर नव्हती? हे सगळे ठरवून चाललेले आहे असा संशय घेण्यास वाव आहे. या पंधरा दिवसांत मालमत्तेची देवाणघेवाणीची कामे उरकून घेतली असावीत, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाचा तपास प्रामाणिक झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी गुंडगिरीकडे लक्ष वळवावे, अशी मागणी केली.

दाते पंचांग बघून अटक केली काय?

बीड जिह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोप करण्यात येत असलेला वाल्मीक कराड अखेर शरण आला. यानंतर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना दाते पंचांग बघून आज कराडला अटक केली काय? असे म्हणत सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

दाते पंचांग बघून आज आत्मसमर्पण केलं ? खरंतर ही पोलिसांसाठी नामुष्कीची बाब आहे. 17 तारखेला शेवटचा कॉल ट्रेस पुण्यात होता आणि सरेंडर पुण्यातच झाले याचा अर्थ इतके दिवस तो पुण्यातच होता. पुण्यात राहून पोलिसांना तो न सापडणे बुद्धीला पटण्यासारखं आहे का ? पोलीस इंटेलिजेन्स काय करत होतं? हे राजकारणी त्यांना संरक्षण देत होते यात शंकाच नाही, अशी पोस्ट दमानिया यांनी एक्सवर केली आहे.