बीड जिह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. राज्यात सतत सरपंचांवर होणारे जीवघेणे हल्ले आणि दिल्या जाणाऱ्या धमक्या अशा घटनांच्या निषेधार्थ राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 31 डिसेंबर ते 2 जानेवारीदरम्यान 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेने घेतला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली, मात्र या घटनेतील मुख्य आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत. ही घटना ताजी असतानाच धाराशीव जिह्यातील सरपंचाच्या कारची तोडफोड करून पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावरून सरपंच संघटना आक्रमक झाली असून महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन सरपंचांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी हत्याप्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक झाली नाही तर राज्यातील सरपंच आणि उपसरपंच 7 जानेवारीला आझाद मैदानात धरणे आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.
काय आहेत मागण्या?
सरपंच सुरक्षेसाठी कायदा करावा, हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्या मागच्या मास्टरमाइंडचा शोध घेण्यात यावा. सरपंच तथा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे, अशी सरपंच संघटनेची मागणी आहे.