
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिल्या सुनावणी बुधवारी केज न्यायालयात पार पडली. यावेळी या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम हे प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर होते असे समजते.
सुनावणीच्या वेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. तर इतर आरोपी हे प्रत्यक्ष न्यायालयात हजर होते. या प्रकरणी सरकारी वकिलांनी पुढची तारीख मागितल्यानंतर न्यायमूर्तींनी 26 मार्च पर्यंत सुनावणी पुढे ढकलली.
अवादा कंपनीकडे मागण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या खंडणीला विरोध केला म्हणून कराड गँगने सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केले. संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा जीवश्च कंठश्च वाल्मीक कराडच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा स्पष्ट उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रदीप घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे हे या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी असून आठवा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.