काही अटी,नियमासह संत ज्ञानेश्वर उद्यान अखेर पर्यटकांसाठी खुले! दिवसभरातील चर्चेनंतर निर्णय

पैठण येथील गेल्या 8 वर्षापासून बंद असलेले संत ज्ञानेश्वर उद्यान रविवारी संध्याकाळी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. उद्यानात अजूनकाही कामे सुरू आहेत. त्यामुळे उद्यान पर्यटकांसाठी खुले करावे की नाही? याबाबत रविवारी दिवसभर जलसंपदा विभागाची चर्चा सुरू होती. अखेर रविवारी संध्याकाळी काही अटी आणि नियमांसह पर्यटकांसाठी उद्यान खुले करण्यात आले.

कोणताही गाजावाजा न करता जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव व उपअभियंता दीपक डोंगरे यांनी संध्याकाळी 6 वाजता संत ज्ञानेश्वर उद्यानाची तिकीट खिडकी उघडली. गेटसमोर नारळ वाढवून उद्घाटन केले. आलेल्या पर्यटकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गेल्या 8 वर्षांपासून कुलुपबंद होते. अखेर रविवारी ते सर्वांसाठी खुले झाले आहे.

हे उद्यान प्रजासत्ताक दिनी खुले होणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे सकाळपासूनच पर्यटक आले होते. मात्र, काही कामे अपूर्णअसल्याने उद्यान खुले करावे की नाही, यावर अधिकाऱ्यांची चर्चा सुरू होती. येथील वाहनतळ, रस्ते व विद्युतीकरण पुर्ण झाले आहे. मात्र, अनेक छोटी छोटी कामे अपूर्ण आहेत. फुलझाडांची रोपे आणून ठेवली असली तरी 310 एकरवर त्याचे रोपण करण्याचे काम सुरू आहे. लॉनची कामे काही ठिकाणी सुरू आहेत. सर्वात आकर्षण असलेल्या संगीत जलकारंजांची अजून चाचणी सुरू आहे. तर अद्ययावत ॲडव्हेंचर पार्क निर्मितीचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. तेथे जाण्यासाठी पर्यटकांना रस्ताही करण्यात आलेला नाही.

उद्यान खुले करण्याचे याआधीचे 15 डिसेंबर व 1 जानेवारी असे दोन्ही मुहुर्त हुकले आहेत. त्यामुळे रविवारी उद्यान खुले करावे की नाही, याबाबत चर्चा सुरू होती. तसेच अनेक पर्यटक सकाळपासून आले होते. त्यामुळे अखेर संध्याकाळी उद्यान सर्वांसाठी खुले करण्यात आले. उद्यान खुले झाल्याने पर्यटकांसह स्थानिक व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

पर्यटकांसाठी नियम आणि अटी
संत ज्ञानेश्वर उद्यानाचे मुख्य आकर्षण असलेले ‘म्युझिक फाऊंटन’ सध्या टेस्टींग अवस्थेत आहे. ते वारंवार बंद पडत असून त्यात लवकरच सुधारणा होईल. ॲडव्हेंचर पार्क देखील खुले करण्यात आले नाही. असे असताना पर्यटकांवर अटी नियम लादण्यात आले आहेत. “विद्युत पुरवठा खंडित झाल्यास व कारंजे बंद पडल्यास तिकीटाचे पैसे परत मिळणार नाहीत, असा फलकच बाहेर लावण्यात आला आहे. सध्या तिकीटाचे दर प्रौढांसाठी 30 रुपये तर 3 वर्षांखालील मुलांना 10 रुपये आहे. वाहनतळावर पार्किंगसाठी बस 50 रुपये, चारचाकी 20 रुपये तर दुचाकी 10 रुपये असे दर आहेत. कॅमेरा शुटिंगसाठी प्रति तास दर आकारले जाणार आहेत, अशी माहिती उपअभियंता दीपक डोंगरे यांनी दिली.