संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब दिंडीचे प्रस्थान; दिंडींचे नेवासात पहिले रिंगण

“ज्ञानोबा माऊली तुकाराम”चा गजर करत नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिर देवस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या माऊलींच्या आषाढी वारी पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. वेदशास्त्रसंपन्न देविदास महाराज हे दिंडीचे नेतृत्व करीत आहेत. दिंडीत सुमारे हजार ते दिडहजार वारकऱ्यांचा सहभाग असून माऊली माऊली असा जयघोष करत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कर्मभूमी असलेल्या नेवासेनगरीत दिंडीचे पहिले रिंगण रंगले.

दिंडीच्या प्रस्थानाच्यापूर्वी मंगळवारी सकाळी “पैस”खांबाचे वेदमंत्राच्या जयघोषात चंदन उटी लावून पूजन करण्यात आले. ज्ञानेश्वर माऊलींच्या प्राकृत चांदीच्या पादुकांचे पूजन झाले. या पादुका डोक्यावर घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिराला दिंडी प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी पुष्पांनी सजविण्यात आलेल्या रथामध्ये माऊलींच्या पादुका ठेवण्यात आल्या. यावेळी संस्थान चे अध्यक्ष पांडुरंग अभंग,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, उदयन गडाख, ऋषीकेश शेटे, व विश्वस्त मंडळ यांनी पायी दिंडी सोहळयास शुभेच्छा दिल्या.

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातून संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी दिंडीस प्रारंभ करण्यात आला. अग्रभागी नृत्य करणारे अश्व,त्यामागे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष करणारे,वारकरी, भजने गाणारे भजनी मंडळाचे पथक,पुष्पांनी सजविण्यात आलेला पालखी रथ, त्यामागे डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या महिला भाविक असे या दिंडीचे स्वरूप होते. नेवासे नगरीत या दिंडीचे फटाक्यांची आतषबाजी व तोफांची सलामी देत चौकाचौकात स्वागत करण्यात आले.विविध संस्था,सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी संतपूजन करत पालखीचे दर्शन घेतले.

दिंडीचे नेवासे येथील एस.टी.च्या प्रांगणात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आगमन झाले असता रिंगण सोहळयाचे आयोजक ,आगारव्यवस्थापक व कामगार संघटना कर्मचारी यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी माऊली माऊली असा जयघोष करत सर्वप्रथम झेंडा पथकाचे,त्यानंतर भजनी मंडळ व वारकऱ्यांसह महिलांचे रिंगण सादर करण्यात आले अश्व नृत्य उपस्थित भाविकांचे आकर्षण ठरले होते. यावेळी भाविक सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.