IPL 2025 – संजूकडे राजस्थानची धुरा

संजू सॅमसन पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्स संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राने बुधवारी संजू सॅमसनला फिट घोषित करून आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे संजू सॅमसन शनिवारी पंजाब किंग्ज संघाविरुद्ध मैदानावर उतरणार आहे.

संजू सॅमसन फिट नसल्यामुळे आयपीएल सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्स संघाने संजू सॅमसनच्या जागी अष्टपैलू रियान परागला कर्णधारपद दिले होते, मात्र आता पुन्हा एकदा संजू सॅमसनकडे ही जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. टीम इंडियाकडून खेळताना संजू सॅमसनच्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे बीसीसीआयच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राने त्याला यष्टिरक्षक आणि कर्णधारपदाची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनाने पहिल्या तीन सामन्यांसाठी रियान परागला संघाचा कर्णधार बनवले होते.