
पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या राजस्थान रॉयल्ससाठी आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला दिल्लीविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाल्याने तो आगामी सामन्यांत खेळण्याबाबत साशंकता असल्याने राजस्थानचा पाय आणखी खोलात गेला आहे.
राजस्थान रॉयल्ससाठी यंदाचा आयपीएल हंगाम फारच निराशाजनक ठरला आहे. आतापर्यंत झालेल्या सात सामन्यांमध्ये राजस्थानला केवळ दोनच सामन्यांत विजय मिळवता आला आहे. त्यामुळे चार गुणांसह राजस्थान गुणतालिकेत आठव्या स्थानी असून, प्ले ऑफचा मार्ग अधिक खडतर झाला आहे.
संघ पराभवाच्या छायेत असतानाच कर्णधार संजू सॅमसनच्या दुखापतीमुळे संघाची डोकेदुखी वाढली आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करत असताना संजूला दुखापत झाली. त्यानंतर देखील तो फलंदाजी करत होता, मात्र वेदना असह्य झाल्याने संजूला अखेर मैदान सोडावे लागले. त्याच्या दुखापतीचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. ही दुखापत कितपत गंभीर आहे हे अहवालाच्या निकालांनंतर स्पष्ट होईल. तसेच उर्वरित हंगामासाठी संजूची उपलब्धता स्कॅनच्या निकालांवर अवलंबून असणार आहे.
संजू सामान्य कामगिरी
संजूने हंगामात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 66 धावा करून चांगली सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर त्याची कामगिरी अत्यंत सामान्य झालीय. तो कोलकाताविरुद्ध फक्त 13 धावा आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 20 धावा करू शकला. यानंतर त्याने पंजाब किंग्जविरुद्ध 38 धावा आणि गुजरातविरुद्ध 41 धावा केल्या. आरसीबीविरुद्ध फक्त 15, तर दिल्लीविरुद्ध 31 धावा केल्यानंतर तो निवृत्त झाला.