
दोन पराभवांनंतर राजस्थानला आपल्या विजयाचे खाते उघडता आले. या विजयानंतर राजस्थानच्या संघात चैतन्य पसरले असून दुखापतीमुळे कर्णधार आणि यष्टिरक्षणापासून दूर असलेल्या संजू सॅमसनला पुन्हा एकदा आपल्या मूळ भूमिकेतून संघाला सांभाळायचेय. त्यासाठी तो बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलेन्सला गेला होता. तो आता फिट असून त्याच्या बोटाचे दुखणेही बरे झाले आहे. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा यष्टिरक्षण मिळावे आणि संघाचे नेतृत्वही करता यावे ही त्याची इच्छा समोर आली आहे.
संजू सॅमसनच्या बोटाच्या दुखापतीमुळे त्याला संघ व्यवस्थापनाने विश्रांती म्हणून यष्टिरक्षणापासून ब्रेक दिला होता आणि त्याचबरोबरीने संघाचे नेतृत्व रियान परागच्या हाती सोपवण्यात आले होते. हिंदुस्थानी संघातील खेळाडूंवर बीसीसीआय बारकाईने लक्ष देत असल्यामुळे ते खेळाडूंच्या कोणत्याही दुखापतीकडे दुर्लक्ष करत नाहीत. रियान परागच्या नेतृत्वाखाली राजस्थानला पराभवाचे दोन धक्के बसल्यानंतर संघाच्या विजयासाठी संजूला आपल्या दोन्ही भूमिकेत पुन्हा खेळता यावे म्हणून तो बीसीसीआयच्या पेंद्रात गेला होता. आपल्याला झालेल्या दुखापतीमुळेच तो कर्णधार आणि यष्टिरक्षणापासून दुरावला होता. 2021पासून राजस्थानचे नेतृत्व सांभाळणाऱया संजूमुळे राजस्थानच्या कामगिरीत जबरदस्त सुधारणा झाली आहे. त्यामुळे त्याला कर्णधार पदावरून हटविण्यात आले आहे किंवा त्याने नेतृत्व सोडलेय, अशी कोणतीही गोष्ट झाली नसल्याचे समोर आलेय.
कर्णधार पद आणि यष्टिरक्षणापासून संजूला विश्रांती असली तरी त्याने गेल्या दोन सामन्यांत 13 आणि 20 धावा केल्या आहेत. मात्र हैदराबादविरुद्ध त्याने 66 धावांची जोरदार खेळी साकारली होती. संजूला आपल्या फलंदाजीसह नेतृत्वही करायचेय. पण सध्या वेगाने बदलत चाललेल्या या स्पर्धेत संजूला संघात कोणत्या जबाबदारीसाठी कायम ठेवले जाईल, याबाबत कुणालाही आपले परखड मत मांडता येत नाहीय. अशा स्थितीत संजू बन गया कॅप्टन हे नेमक्या कोणत्या सामन्यात पाहायला मिळेल, याची कल्पना अद्याप संजूलाही नाही. तोपर्यंत वेट अॅण्ड वॉच ठेवण्याशिवाय त्याच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही.