धोनी, कोहलीमुळे माझ्या मुलाची 10 वर्षे वाया, संजू सॅमसनच्या वडिलांचा गंभीर आरोप

टीम इंडियाचा अनुभवी यष्टिरक्षक, फलंदाज संजू सॅमसनने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये लागोपाठ दोन शतके ठोकून अवघ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले. संजूच्या या पराक्रमामुळे त्याचे वडील विश्वनाथ सॅमसन यांच्या भावनांचा उद्रेक झालेला बघायला मिळाला. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, स्टार फलंदाज विराट कोहली तसेच हिंदुस्थानी संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यामुळेच माझ्या मुलाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची 10 वर्षे वाया गेली, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

विश्वनाथ सॅमसन यांनी एका वृत्तसंस्थेला नुकत्याच एका मुलाखतीत केलेल्या आरोपांची सध्या क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. ‘एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यामुळे संजू सॅमसनची कारकीर्द  उद्ध्वस्त झाली. मात्र गौतम गंभीर यांच्याकडे हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी येताच त्यांनी संजू सॅमसनला पुन्हा एकदा टी-20 फॉरमॅटमध्ये हिंदुस्थानी संघाकडून खेळण्याची संधी दिली. माझ्या मुलाने त्या संधीचं सोनं करून दाखवलं,’ असेही विश्वनाथ सॅमसन यांनी सांगितले.

नव्या प्रशिक्षकांची साथ!

हिंदुस्थानी क्रिकेट संघाला नवा प्रशिक्षक मिळाल्यानंतर संजू सॅमसनचं नशीब फळफळलं. नवे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टी-20 फॉरमॅटचा कर्णधार सूर्यकुमार यादव या दोघांनी संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले. मग संजूने सलग दोन सामन्यांत शतकी खेळी करून आपण अजून संपलेलो नाही, हे दाखवून दिले. टी-20 फॉरमॅटमध्ये सलग दोन सामन्यांत शतक झळकावणारा सॅमसन पहिला हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे.

सूर्यकुमारकडून मिळाले बळ!

सूर्यकुमार यादवने आपल्यावर विश्वास टाकत मोठे बळ दिले होते, याबाबत संजू सॅमसनने माहिती दिली होती. ‘‘दिलीप ट्रॉफीचे सामने चालू होते. त्या वेळी सूर्या माझ्याजवळ आला. पुढचे सात सामने तू फलंदाजीसाठी सलामीला जाशील. काहीही होऊ देत, मी तुझ्या सोबत असेल, असे मला सूर्या म्हणाला होता, असं संजू सॅमसनने सांगितलं. या पाठिंब्यामुळे मला मोठं बळ मिळालं. म्हणूनच मी लागोपाठच्या टी-20 सामन्यांत शतक ठोकू शकलो,’’ असे संजू सॅमसनने सांगितले होते.

त्रास दिला तेवढा तो मजबूत झाला!

महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, राहुल द्रविड या चार लोकांमुळे माझ्या मुलाला 10 वर्षे संघर्ष करावा लागला. या चार लोकांनी माझ्या मुलाला जेवढा त्रास दिला, संजू सॅमसन तेवढाच मजबूत झाला, असे विश्वनाथ सॅमसन म्हणाले. संजू सॅमसनला या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियात स्थान मिळाले होते. मात्र सराव सामन्यांत खराब खेळी केल्यामुळे संजूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही.