न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संजीव खन्ना यांना शपथ दिली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनमध्ये हा शपविधी झाला. संजीव खन्ना सर्वोच्च न्यायालयाचे 51 वे सरन्यायाधीश बनले आहेत. धनंजय चंद्रचूड हे सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर संजीव खन्ना हे नवे सरन्यायाधीश झाले आहेत. न्यायमूर्ती खन्ना यांचा कार्यकाळ हा सहा महिन्यांचा आहे. सरन्यायाधीशांच्या पीठासमोर अनेक मोठी प्रकरणं प्रलंबित आहेत. यात महाराष्ट्रातील आमदार अपात्रता प्रकरणाचाही समावेश आहे.
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी न्यायप्रविष्ट खटल्यांना प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे प्रसिद्धीच्या झोतात राहणे त्यांना पसंत नाही. कारण सोशल मीडियाच्या युगात न्यायाधीशांनी वास्तवासह जगले पाहिजे, असा त्यांचा विश्वास असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आपल्या कार्यकाळात अनेक मोठे आणि ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. खन्ना हे आतापर्यंत RTI, न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता, VVPAT, इलेक्टोरल बॉन्ड आणि अनुच्छेद 370 सह अनेक निर्णयांमध्ये सहभागी होते. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली होती. संजीव खन्ना यांची 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली होती.