अरविंद केजरीवाल कोमात जाऊ शकतात, त्यांच्या जिवाला धोका – संजय सिंह

आम आदमी पार्टीचे संस्थापक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती एकदम ठीक असल्याचा दावा तिहार तुरुंगातील अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र आपचे खासदार संजय सिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषद त्यांचा हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. ”केजरीवाल यांना अटक झाल्यापासून त्यांच्या रक्तातील साखर पाच वेळी 50 च्या देखील खाली गेली आहे. अशाने ते कधीही कोमात जाऊ शकतात. यात त्यांचा जीवही जाऊ शकतो, असा दावा संजय सिंह यांनी केला आहे.

अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक झाली. त्यावेळी त्यांचे वजन 70 किलो होते. मात्र तुरुंगातील काळात त्यांचे वजन साडे आठ किलोने कमी होऊन 61.5 किलोवर आले. वजन एवढे कसे कमी झाले याची गांभीर्याने तपासणीही होत नाही. अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जास्तीत जास्त त्रास द्यायचा आणि त्यांच्या जीवाचा खेळ करायचा हेच भाजपचे उद्दिष्ट आहे, असा आरोप संजय सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर सोमवारी तिहार तुरुंगातून हे आरोप फेटाळण्यात आले. तिहार तुरुंगाने अरविंद केजरीवाल यांना दररोज घरचा डब्बा दिला जातो व त्यांची प्रकृती उत्तम आहे असा दावा तिहार तुरंगाकडून करण्यात आला.

तिहार तुरुंगाचा हा दावा खोटा असल्याचे संजय सिंह म्हणाले आहेत. ”’अटक झाल्यापासून अरविंद केजरीवाल यांची रक्तातील साखर पाच वेळा पन्नासच्या खाली आली होती. एम्स रुग्णालयाचे एक वैद्यकीय पथक केजरीवाल यांची तपासणी करत असून त्यांच्या निदर्शनास आले आहे की त्यांचे वजन झपाट्याने कमी होत आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होतेय. त्यामुळे ते कोमातही जाऊ शकतात किंवा त्यांचा मृत्यूही होऊ शकतो, असे संजय सिंह म्हणाले.