महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्यांची वर्णी लावण्याची प्रथा मोडीत काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदाची धुरा प्रशासनातील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याकडे सोपवली आहे. 1962नंतर प्रथमच असा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे आता परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्याकडे सोपवली आहेत. एसटीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे.
अलीकडच्या काळात म्हणजे आघाडी सरकारच्या काळात जीवन गोरे, सुधाकर परिचारक हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष राहिले आहेत. 2014 ते 2019 या युती सरकारच्या काळात तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यानंतर 2024मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे महाडचे आमदार भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद देण्यात आले होते.