शिवसेना स्थापन करताना ज्यांचा जन्म झाला नाही, त्यांच्या हातात निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह ताब्यात दिले आहे. निवडणूक आयोग कुणाच्या तालावर चालते, हे जनतेला माहित असून घटनेच्या 10 व्या शेडूलप्रमाणे 24 तासात सरकार बदलायला हवे, मात्र असे होताना दिसत नाही, त्यामुळे येणार्या काळात या राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जो अपमान झाला आहे, त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे आणि नांदेड त्यात मागे राहणार नाही, अशा भावना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या.
आज नांदेड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, राज्य संघटक एकनाथ पवार, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख माधव पावडे, जिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ बंडू खेडकर, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नांदेड जिल्हा हा शिवसेनेचा एकेकाळी बालेकिल्ला राहिला आहे. निष्ठावंत शिवसैनिक आहे तेथेच आहेत, या जिल्ह्यात देखील शिवसेनेशी गद्दारी झाली आहे, तो कलंक आपल्याला या निवडणुकीत पुसून काढायचा आहे, जागा वाटपात जागा सुटल्यानंतर ती जागा कशी निवडून आणायची यासाठी आजपासूनच कंबर कसून नियोजन करा, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्रात कायद्याचा धाक राहिलेला नाही, महिलांवर, अल्पवयीन मुलीवर अत्याचार होत आहेत. कालच्या नागपूरच्या घटनेनंतर सर्व बाबी आता समोर आल्या आहेत. एकाला एक न्याय दुसर्याला एक न्याय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणूक आयोग न्यायव्यवस्था यांच्यामार्फत न्याय मिळत नाही, पक्षाचा संस्थापक जिवंत आहे, पण पक्ष तुमचा नाही, अशी अवस्था राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची निवडणूक आयोगाने केली. पक्षाचा संस्थापक समोर बसला असताना तो पक्ष तुमचा नाही, हे निवडणूक आयोग समोर सांगत आहे, शिवसेना पक्ष ज्यावेळी स्थापन झाला त्यावेळी ज्यांचा जन्म झाला नाही, त्यांच्या ताब्यात शिवसेना नाव व पक्ष चिन्ह हे निवडणूक आयोग देते, हा सरासर झालेला अन्याय जनता ओळखून आहे. घटनेच्या दहा शेडूलप्रमाणे सरकार 24 तासात बदलायला हवे होते, मात्र आम्ही तीन वर्ष झाले न्यायालयात याबाबत संघर्ष करत आहोत, असेही ते म्हणाले.
नांदेड जिल्हा हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. जिल्ह्यात पक्षात झालेली गद्दारी त्यामुळे शिवसैनिक संतापून उठला आहे. गद्दारीचा हा कलंक पुसून काढण्यासाठी आजपासून कंबर कसून कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. नांदेड जिल्हा हा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या क्रमांकावर आला पाहिजे व विधानसभेत मराठवाड्यातून सर्वाधिक आमदार निवडून आले पाहिजेत, त्यात नांदेड जिल्हा पहिल्या क्रमांकावर असला पाहिजे या दृष्टीने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.