महाराष्ट्र, मुंबईमध्ये एक प्रकारचे अराजक निर्माण झालेले आहे. भाजपचा विजय झाल्यापासून मुंबईमध्ये मराठी माणसावर अनेक मार्गाने हल्ले सुरू आहेत. ही मुंबई भाजपने जिंकलेली आहे. मुंबईत मराठी बोलू नका, गुजराती, मारवाडी बोला अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. महाराष्ट्र, मराठी माणसाच्या दृष्टीने हे चित्र अत्यंत गंभीर आहे. विधानसभेत तुम्ही आमचा गैरमार्गाने पराभव केला असला तरी मराठी माणसाचे लढण्याचे बळ तुम्ही नष्ट करू शकत नाही. सत्ता नसतानाही आम्ही मुंबई, महाराष्ट्रासाठी लढलो आणि लढत राहू… महाराष्ट्राच्या दुश्मनांना धडा शिकवू, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला ठणकावले. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
‘मुंबईत भाजपची सत्ता आली आहे. आता मराठी चालणार नाही. मारवाडीतच बोलायचं,’ अशी मुजोरी एका मारवाडी व्यापाऱ्याने मराठी महिलेवर केली. मराठी माणसाचा बालेकिल्ला असलेल्या गिरगावात हा धक्कादायक प्रकार घडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, मुंबईत मराठी बोलू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत. मराठी माणसाला उचलून आणण्याच्या, मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. फडणवीस यांच्या अवतीभवती अमराठी, परप्रांतीय, उपरे आणि डुप्लिकेट शिवसेना आहे आणि हे चित्र निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या, कष्टकऱ्यांच्या भविष्यासाठी हे चित्र अत्यंत गंभीर आहे.
मुंबई मराठी माणसाच्या त्यागातून, कष्टातून निर्माण झालेली आहे. 10 फूट जरी जमीन खोदली तरी तुम्हाला मराठी माणसाचे रक्त, बलिदान त्यात दिसेल. हे आंदोलन, हा संघर्ष भाषा, संस्कृती आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी झाले. भाजपचा विजय होताच महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी बोलायचे नाही अशा धमक्या दिल्या जातात आणि या राज्याचे होणारे मुख्यमंत्री व गृहमंत्री हे सहन करताहेत ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, असेही राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीमध्ये गुजराती, मारवाडी, जैन बांधवांच्या संदर्भात वेगळी भूमिका घेऊन मराठी माणसाच्या विरुद्ध उभे करण्याचे काम सत्ताधारी लोकांनी केले. मुंबईवरचा मराठी माणसाचा पगडा पुसून टाकून ती मराठी माणसाच्या दुश्मनांच्या हातात सोपवायची भूमिका त्यांनी घेतली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून आम्ही मुंबईत काम करतो. मुंबईत हिंदी भाषिक गुजराती, मारवाडी, जैन, पारशी, सिंधी सगळे राहतात. आम्ही अन्य भाषिकांना अशा धमक्या दिल्या नाहीत. मुंबईवर पहिला हक्क मराठी माणसाचा राहील आणि तुम्ही आमच्याशी मिळून-मिसळून रहा ही आमची भूमिका कायम राहिली. पण आज मुंबई बिल्डरांच्या घशात घातली जात असून त्या पैशातून आलेली ही मस्ती आहे. विधानसभेत तुम्ही आमचा गैरमार्गाने पराभव केला असला तरी मराठी माणसाचे लढण्याचे बळ तुम्ही नष्ट करू शकत नाही. सत्ता नसतानाही आम्ही मुंबई, महाराष्ट्रासाठी लढलो आणि लढत राहू आणि महाराष्ट्राच्या दुश्मनांना धडा शिकवू.
सत्तास्थापना आणि मंत्रिपदांवरून सुरू असलेल्या तमाशावर बोलताना राऊत म्हणाले की, सरकार बनवणे, कुणाला काय देणे हे दिल्ली ठरवेल. पण ज्या काही लुटुपुटूच्या लढाया सुरू आहेत त्या काही महाराष्ट्राच्या हिताच्या नाहीत. राज्यात सरकार यावे आणि चालावे ही आमची भूमिका आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, बेरोजगारी, महागाई यासारखे असंख्य प्रश्न असून त्या संदर्भात तत्काळ पावलं उचलावीत ही आमची भूमिका, असेही राऊत म्हणाले. तसेच बहुमत मिळूनही भाजप महाराष्ट्रासारख्या राज्यात वेळेवर सरकार स्थापन करू शकलेले नाही. अंतर्गत कुरबुरींमुळे भाजपलाही महाराष्ट्रात सरकार बनवणे कठीण जात आहे. सरकार बनवताना कठीण जात असेल तर सरकार चालवण्याची गंभीर परिस्थिती यांच्यावरती येऊ शकते. जो तो आपापल्या पद्धतीने महाराष्ट्राची कशी लूट करेल याचा ट्रेलर आम्ही गेल्या 8 दिवसांपासून पाहतोय, असेही राऊत म्हणाले.