राज्यातील सत्तास्थापनेवर बोलताना शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप मिंधेंना फटकारले आहे. ‘भाजप जगातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष, देशात मोदींसारखा मजबूत नेता आहे, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांसारखा मजबूत नेता. असे असतानाही एका गृहमंत्रीपदावरून महाराष्ट्र राज्याचं सरकार लटकून पडलं आहे. बहुमत असतानाही पंधरा दिवस शपथ घेत नाही. त्यामुळे मला वाटतं की हे एका गृहमंत्रीपदावरून थांबलेलं नाही. भाजपने मनात आणलं तर समोरचे जे मागण्या करतायत त्यांना चिरडून टाकतील”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी उद्यापर्यंत सरकार स्थापनेबाबत उलगडा करा नाहीतर आम्ही आमची पुस्तकं उघडू, असा इशारा देखील भाजप मिंध्यांना दिला.
”भाजप जगातला पहिला क्रमांकाचा पक्ष, मोदींसारखा मजबूत नेता. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सारखा मजबूत नेता. असे असतानाही एका गृहमंत्रीपदावरून महाराष्ट्र राज्याचं सरकार लटकून पडलं आहे. तुमच्याकडे बहुमत आहे. तुमच्यासोबत अजित पवार आहेत. बहुमत असतानाही पंधरा दिवस शपथ घेत नाही. राज्याला सरकार देत नाही. समर्थक आमदारांची नावं द्यायला तयार नाही. राज्यपालाकडून तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण घेतलं नाही आणि तुम्ही मांडव घातला. काय प्रकार आहे हा. हे एका गृहमंत्रीपदावरून थांबलेलं नाही. भाजपने मनात आणलं तर समोरचे जे मागण्या करतायत त्यांना चिरडून टाकतील. ते काही स्वबळावर निवडून आलेले नाही. ते कसे निवडून आले ते भाजपला माहित नाही. एका गृहमंत्रीपदावरून हे सरकार लटकलेलं नाही. अनेक राज्यात भाजपने सरकार बनवली आहेत. प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन मुख्यमंत्री आणले आहेत. वेगळं काही समिकरण आहे का? फडणवीसांच्या जागी कोण येतंय का? उद्या पर्यंत या सर्वाचा उलगडायला हवा नाहीतर आम्ही आमची पुस्तकं उघडू, असे संजय राऊत म्हणाले.
”एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद यासाठी हवंय की त्यांनी याआधी पोलीस यंत्रणा वापरून खोटे गुन्हे दाखल केले आहेत. दहशत निर्माण केली. यंत्रणेचा वापर करून त्यांनी निवडणूक लढवली. हीच यंत्रणा वापरून ते भाजपच्या अंगावर जाऊ शकतात ही त्यांची विकृती आहे. दुसऱ्या क्रमांकाचं खातं गृहखातं आहे. देवेंद्र फडणवीसांनी ते खातं कायम स्वत:कडे ठेवलेलं आहे. ते नेहमी असे म्हणायचे की गृहखातं उद्धव ठाकरेंनी दुसऱ्याकडे द्यायला नको होतं. जर गृहखातं व विधानसभेचं अध्यक्षपद आमच्याकडे असतं तर आमचं सरकार पडलंच नसतं, असं संजय राऊत म्हणाले.