
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून शुक्रवारी रात्री एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये शेअर केलेल्या फोटोत एक बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे. ‘खबर पता चली क्या? एसंशी गट’, असे कॅप्शन या ट्विटला देण्यात आलेले आहे. या ट्विटची सध्या चर्चा आहे.
शनिवारी माध्यम प्रतिनिधींनीही संजय राऊत यांना या ट्विटबाबत प्रश्न विचारला. याला उत्तर देताना राऊत म्हणाले की, ‘महाराष्ट्रातला एक बकरा आहे. हा बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे. बकऱ्याला सांगितले आहे की, फार शहाणपणा केला तर मान उडवेल. आता बस झाले, तुमचे खूप ऐकले. गप्प उभे रहायचे आणि बे… बे… करत रहायचे, असे दोन दिवसांपूर्वी बकऱ्याच्या कानात दिल्लीत कुणीतरी सांगितले आहे.’
खबर पता चली क्या?
ए सं शी गट …. pic.twitter.com/PkELeRQBEf— Sanjay Raut (@rautsanjay61) April 11, 2025
पंडित नेहरूंप्रमाणे चालत जाणार नाहीत
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी किल्ले रायगडावर जाणआर आहेत. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, ‘ते गृहमंत्री असून त्यांच्याकडे लष्कराचे हेलिकॉप्टर आहे. ते हेलिकॉप्टरने किल्ले रायगडावर उतरणार आहेत. पंडित नेहरू जसे प्रतापगडावर चालत गेले होते, तसे येत नाहीय ना. सरकारी हेलिकॉप्टरने येणार असून खाली उतरल्यावर तटकरे यांच्याकडे जेवणाचाही कार्यक्रम आहे.’
‘एसंशी’ गटाकडून पक्षप्रमुखाच्या स्वागताची तयारी
दरम्यान, शुक्रवारी रात्री आशिष शेलार, एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची पुण्यात भेट घेतली. अमित शहा हे एकनाथ शिंदे यांचे नेते आहेत. शिंदे यांच्या पक्षाचे पक्षप्रमुख शहाच आहेत. शहांनी त्या पक्षाला जन्म देण्याचे काम केले आहे. पक्षप्रमुख दिल्लीतून येत असल्याने शिंदेंना उपस्थित रहावेच लागेल ना. पक्षप्रमुख येत असल्याने त्यांची तयारी सुरू असल्याचेही मी काल पाहिले, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
तुम्ही काय राज्य चालवणार?
शहांच्या भेटीदरम्यान पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना राऊत यांनीही यावर भाष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. राज्याचे मुख्यमंत्री गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिक आणि रायगड या दोन प्रमुख जिल्ह्याला पालकमंत्री देऊ शकलेले नाहीत. मी सांभाळेल म्हणतात, पण हे काय काय सांभाळणार आहेत? पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवू शकत नाही ते राज्य काय चालवणार, अशी टीका राऊत यांनी केला.