दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत सहभागी झाले आहेत. पण दावोसमध्ये जाऊन उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यापेक्षा फोडाफोडीच्या राजकणावर भाष्य करतायत. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी उद्योग मंत्र्यांना तत्काळ मुंबईला परत पाठवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच फोडाफोडीच्या राजकारणावरून उदय सामंत यांना फटकारले आहे.
दावोस ही काय राजकारण करायची जागा आहे का?
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी दावोसमध्ये बसून महाराष्ट्रातील राजकारणावर बोलणाऱ्यांना खडे बोल सुनावले. ‘संजन जिंदाल यांच्या कंपनीसोबत दावोसमध्ये एक करार झाला. संजन जिंदाल संभाजीनगरमध्ये त्यांचा प्रकल्प उभा करणार आहेत. यातून 10 हजार लोकांना रोजगार देणार ही चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस येथे आहेत. मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत तेथे बसून महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करत असतील, तर त्याचे कौतुक केलं पाहिजे. पण उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यापेक्षा शिवसेनेचे किती आमदार, खासदार फुटतील हे दावोसमधून सांगतात. दावोस ही काय राजकारण करायची जागा आहे का? माझं मुख्यमंत्र्यांकडे मागणं आहे, त्यांनी उदय सामंत यांना तत्काळ महाराष्ट्रात परत पाठवायला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून या दावोस दौऱ्याचा खर्च वसूल केला पाहिजे. तसेच उदय सामंत यांना हा जाब विचारला पाहिजे. तुम्ही सरकारी खर्चांने गेलात. लाखो डॉलर खर्च करताय आणि तिथे बसून रोज तुम्ही गुंतवणूक वाढवण्यापेक्षा, उद्योग वाढवण्यापेक्षा कोणाचे किती आमदार- खासदार फोडतोय हे सांगतायत. दावोसला जाऊन हे करणं उद्योगमंत्र्यांचं काम आहे का? हे करायला तुम्ही दावोसला गेलाय का? काय करतात ते तिकडे बसून? ते तिकडे शिंदेंचे आमदार फोडायला गेलेत. आणि आता भांडं फुटल्यामुळे सारवासरव करताहेत. एकनाथ शिंदेंना, अजित पवारांना कोणाचा आशिर्वाद होता. फाटाफूट शिरोमणी बसलेत ना दिल्लीत, गुरुमहाराज. शिंदे नरेंद्र मोदींना नकोसे होतील आणि आता फडणवीसांना नकोसे झालेच आहेत. भाजपचं अत:रंग माझ्याशिवाय कोणीच ओळखू शकणार नाही. मी सातत्याने यांच्या कट कारस्थानावर पक्षांतर्गत आणि बाहेरही बोलत राहिलो. अटलजी, अडवाणी साहेब, प्रमोदजी होते तोपर्यंत आमचं बर चाललं होतं. पण गेली 10 वर्षे प्रत्येक दिवस हा शिवसेनेविरुद्ध कटकारस्थाने करण्यामध्ये दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये गेला, असे संजय राऊत पुढे म्हणाले.
फोडाफोडीच्या राजकारणावर संजय राऊत यांनी ताशेरे ओढले. ‘तुम्ही स्वत: फुटलात, बेईमान झालात. तुमच्या कपाळावर बेईमानीची पट्टी लागली आहे. मेरा बाप चोर आहे… एका चित्रपटाच्या डायलॉगप्रमाणे मेरा खांदान चोर और बेईमान है, असं यांच्या कपाळावर लिहिलय. आता फक्त त्यांना एवढच सांगायचं बाकी, संजय राऊत एकनाथ शिंदेंला भेटले. आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेला भेटले. सुनिल राऊत एकनाथ शिंदेला भेटले. सगळेच भेटले आणि सगळे फुटतायत. यांच्या आयुष्यात दुसरं शिल्लक काय आहे? महाराष्ट्राचा विकास नाही. जातायत दरे गावात जाऊन बसतायत, कोण कुठे जातायत? कोण पालकमंत्री पदासाठी रस्त्यावर आंदोलन करतायत? हे या महाराष्ट्राचा कारभार सुरू आहे. आयुष्यभर यांनी फोडाफोडी केली. स्वत: फुटले. हे पवार साहेबांना भटकती आत्मा म्हटले होते, पण हे सगळे भटकती आणि लटकती आत्मा आहेत. कुठेतरी समाधान माना. ईव्हीएमचा आदर करा. या महाराष्ट्र राज्याची प्रतिष्ठा सांभाळा. उद्या शिवसेना प्रमुखांचा जन्म दिवस आहे. आणि तुम्ही दावोसमध्ये बसून पक्षफोडायची भाषा करताय. लाज वाटत नाही तुम्हाला, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
आम्ही मरण पत्करु पण शरण जाणार नाही
आम्ही मरण पत्करू पण शरण जाणार नाही, अशी भूमिका असलेले आम्ही 20 आमदार आहोत. ज्यांना जायचंय ते बेईमान शेण खायला गेले यांच्याबरोबर, आम्ही कशाला जाऊ. आम्हाला स्वाभिमान आहे महाराष्ट्राचा, मराठी मातीचा. त्यामुळे आम्ही कुठेच जाणार नाही, असा विश्वास यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला.