मुख्यमंत्री, गृहमंत्री जरांगे-पाटलांना राजकीय प्यादं म्हणून बघताहेत; संजय राऊत यांचा घणाघात

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत हजारो मराठ्यांनीही मुंबईकडे कूच केली आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले असून महायुती सरकारला धारेवर धरले आहे.

मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे-पाटलांच्या आंदोलनाविषयी विचारले असता खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पुढील काळ अत्यंत गंभीर वाटत आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री हे मनोज जरांगे-पाटील यांना राजकीय प्यादं म्हणून बघत आहेत आणि महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मनोज-जरांगे पाटील यांच्याशी ताबडतोब सकारात्मक चर्चा व्हायला पाहिजे आणि ती चर्चा निर्णयापर्यंत पोहोचायला पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.

यावेळी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तपास यंत्रणांमार्फत केल्या जाणाऱ्या कारवाईवरही राऊत यांनी टीका केली. जनता न्यायालयातून शिवसेनेने देशातील न्यायालयं, संविधानिक संस्था, निवडणूक आयोगाचा खोटारडेपणा उघड केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमच्या लोकांवर धाडी टाकल्या गेल्या, शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना अटक केली. किशोरी पेडणेकर, रोहित पवार, रविंद्र वायकर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली. हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावरही तुम्ही इंडिया आघाडीतून बाहेर पडा आणि अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करा असा दबाव आहे. तसेच शिवसेनेकडे येणारी जी प्रमुख लोकं आहेत, जे आमचे उमेदवार होऊ शकतात त्यांच्यावरही शिवसेनेच्या आसपास फिराल तर तुमच्यामागे ईडी, सीबीआय लावू असा दबाव आहे. पण या सगळ्याला न जुमानता शिवसेना पुढे जाईल, संघर्ष करेल आणि त्यासाठी नाशिकचे अधिवेशन मैलाचा दगड ठरेल, असे राऊत म्हणाले.

भाजप मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन शिवसेनेवर निशाणा साधत आहे का? असे विचारले असता राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री स्वत:ला शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक समजतात. मग आपण काय करतोय, आपल्या खांद्यावर बंदुक ठेऊन काय केलं जातंय याची त्यांना अक्कल नाही का? महाराष्ट्राची शान आणि अभिमान असलेल्या शिवसेनेचे तुकडे केले आणि त्यातील एका तुकड्याचे नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री करत आहेत. हा महाराष्ट्रावर, मराठी माणसावर झालेला आघात आहे हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजत नाही का? इतकी लाचारी, इतकी गुलामी? असा सवाल तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाराष्ट्रासाठी लढत राहिल, असेही राऊत यांनी ठणकावले.