रवींद्र वायकरांना ‘क्लीन चिट’, संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, ‘आता फक्त दाऊदला…’

मतमोजणी केंद्रात हेराफेरी करून खासदार झालेले रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. मुंबई महापालिकेने गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी म्हटले. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यातील मिंधे सरकार आणि केंद्रातील मोदी सरकावर हल्लाबोल केला. आता फक्त दाऊद इब्राहिमला क्लीन चिट द्यायचे बाकी ठेवले आहे, असा घणाघात राऊत यांनी चढवला.

शनिवारी सकाळी माध्यप्रतिनिधींनी वायकरांना मिळालेल्या क्लीन चिटबाबत विचारले असता खासदार संजय राऊत म्हणाले की, आता फक्त दाऊद इब्राहिमला क्लीन चिट द्यायचे बाकी ठेवले आहे. महाराष्ट्रातील असो किंवा दिल्लीतील सरकार असो, हे ओवाळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहेत आणि दंडाची बेडकी फुगवून आमची दाकद किती वाढली हे दाखवत आहेत. याच लोकांवरती भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करा, ईडी-सीबीआयचे खटले दाखल करा म्हणून भाजपची लोकं ओरडत होती. त्यात रवींद्र वायकर सुद्धा असून या खटल्याला घाबरून ते पळून गेले. आता त्यांना क्लीन चिट देण्यात आली. देशात मोदींच्या किंवा महाराष्ट्रात फडणवीस यांच्या सरकारमध्ये दुसरे काय होऊ शकते. हे कायद्याचे राज्य आहे का? असा सवाल राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, याचाचा अर्थ असा आहे की तुम्ही (मिंधे आणि मोदी सरकार) आमच्या लोकांवर खोटे खटले, गुन्हे दाखल केले. त्यांच्या मनात भीती निर्माण केली आणि आपल्या पक्षात घेतले हे आता मान्य करा. आमच्यावरही खोटे गुन्हे, खटले दाखल करून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. पण आमच्यासारखे काही लोकं दबावाला बळी पडले नाहीदत. ज्यांचे काळीज उंदराचे आहे ते लोकं पळून गेले. राष्ट्रवादीतून अजित पवार, शिवसेनेतून मुख्यमंत्री शिंदे पळून गेले. त्यांना कारवाईची भीती होती. त्यांच्याबरोबर आमदार, मंत्रीही पळून गेले. त्यात वायकरही असून आता भाजपने मान्य केले पाहिजे की आम्ही भीती निर्माण करण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले होते. वायकरांवरील गुन्हे मागे घेतले. आमच्यावरीलही मागे घ्या. नवाब मलिक यांच्यावरीलही गुन्हे मागे घ्या. की आम्ही तुमच्या पक्षात येत नाही, दबावाला बळी पडत नाही म्हणून आमच्यावर खटले दाखल केलेत का? असा सवालही राऊत यांनी केला.

यावेळी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचाही समाचार घेतला. किरीट सोमय्या फडतूस माणूस असून आता त्यांनी वायकरांना दिलेल्या क्लीन चिटवर बोलावे. ते जर सत्यवचनी असतील तर, भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन, वाशिंग मशीनमध्ये घालून धुवायचे काम जे सुरू आहे त्याच्यावर बोलावे. पण तुम्ही बनावट, डुप्लिकेट असाल तर बोलणार नाहीत, असे आव्हानही राऊत यांनी दिले.

दरम्यान, रवींद्र वायकर यांच्यावर गैरसमजातून गुन्हा दाखल झाल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले. यावर बोलताना राऊत म्हणाले की, अशाच प्रकारच्या राजकीय गैरसमजातून अनेक गुन्हे दाखल झाले असून लोकांना तुरुंगात जावे लागले. ते देखील मागे घ्यावेत. पोलीस, ईओडब्ल्यू गैरसमजातून गुन्हे दाखल करू शकतात का? यासाठी ईओडब्ल्यूच्या प्रमुखांवर खटला चालला पाहिजे. गैरसमजातून गुन्हे दाखल करत वायकरांना मनस्ताप दिला व शिवसेनेतून पळून जायला भाग पाडले त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, असे आव्हान राऊत यांनी गृहमंत्री फडणवीस यांना दिले.

वायकर यांच्या ‘मॅनेज’ विजयावरून वाद; भाजपच्या धमकीला भरत शाह यांनी दिले सडेतोड उत्तर

आमचीही 288 जागांवर तयारी, कारण…

काँग्रेसने 288 जागांवर तयारी सुरू असून त्यांचे एकला चलोचे धोरण आहे का? असे विचारले असता राऊत म्हणाले, अजिबात नाही. शुक्रवारीच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाविकास आघाडीची बैठक पार पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण अशा प्रमुख नेत्यांमध्ये बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आम्ही एकत्र लढणार असून आमचीही 288 मतदारसंघात तयारी सुरू आहे. कारण, कोणता मतदारसंघ कोणाच्या वाटेला येईल हे अद्याप ठऱलेले नाही. त्यामुळे 288 जागांवर तयारी हवीच, असेही ते म्हणाले.