हा देश म्हणजे जेल नाही! संजय राऊतांचे राज्यसभेत तडाखेबंद भाषण

राज्यसभेत आज इमिग्रेशन आणि फॉरेनर्स बिल 2025 मांडण्यात आले. या विधेयकावर चर्चा करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले. हा देश धर्मशाळा नसला तरी तुरुंग देखील नाही, असं संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.

जेव्हा इमिग्रेशन आणि फॉरेनर्स बिल संसदेत मांडण्यात आले, तेव्हा गृहमंत्री (अमित शहा) म्हणाले की, हा देश धर्मशाळा नाही आणि आम्ही हा देश धमर्शाळा होऊ देणार नाही. या देशाला धर्मशाळा बनवण्याचा कोणाचाही हेतू नाही. पण हा देश जेलही नाही, असं संजय राऊत राज्यसभेत म्हणाले

बाळासाहेबांचे नाव घेताच संजय राऊत यांनी ठणकावले

यावेळी सत्ताधारी बाकांवरून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला गेला. त्यावर संजय राऊत यांनी त्यांना चांगल्याच शब्दात सुनावले. “ए! कोण आहे? कोणी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं? तिथून तुम्ही काहीही कमेंट करता. आम्ही ऐकत राहतो, तुम्ही बोलत राहता. तुम्हाला काय माहित आहे, 10 वेळा पक्ष बदलणारे हे लोक आहेत.”

इमिग्रेशन आणि फॉरेनर्स बिल 2025 वर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “गेल्या 10 वर्षात देशातील नागरिकांना एक प्रकारे तुरुंगातच ठेवण्यात आलं आहे. मात्र आता वैध पासपोर्टवर आणि व्हिसावर या देशात जे परदेशातील लोक येतील, त्यांनाही कदाचित या कायद्याअंतर्गत तुरुंगात ठेवायचं आहे. या सरकारच्या कठोर कायद्यात, ज्या प्रकारे अटी घालण्यात आल्या आहेत, अनेक अॅक्ट लादण्यात आले आहेत, यामुळे हळू हळू येथे परदेशी पर्यटकही येणं बंद करतील.”

ते म्हणाले, “हा कायदा हवा, देशात कोणीही बेकायदेशीरपणे राहावे, अशी आमची इच्छा नाही. मग तो बांगलादेशी असो, रोहिंग्या असो, अमेरिकन असो किंवा युरोपियन असो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या हिंदुस्थानी लोकांना जे तिथे बेकायदेशीरपणे राहत होते. त्यांच्या हातात आणि पायात बेड्या ठोकून लष्कराच्या विमानात बसवून इथे पाठवले. हा कायदा पास झाल्यानंतर जर येथे कोणी अमेरिकन बेकायदेशीरपणे राहत असेल तर त्याच पद्धतीने हातात आणि पायात बेड्या ठोकून वॉशिंग्टनला पाठून द्या.”

संजय राऊत पुढे म्हणाले की, “संपून देशात रोहिंग्या आणि बांगलादेशी 3 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. हे सर्वातआधी मुंबईत आम्ही सुरू केलं. सर्वातआधी बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज दिला होता की, येथे एकही बांगलादेशी नाही राहणार.”

या विधेयकावर बोलताना ते म्हणाले की, याच्या सेक्शन 7 मध्ये असं लिहिलं आहे की, जे परदेशी पर्यटक येथे येतील, ते आल्यावर ते कुठे राहतील हे केंद्र सरकार ठरवेल आणि त्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवेल. तो कोणत्या हॉटेलमध्ये राहणार, कुठे प्रवास करणार, कुठे जाणार हे सरकार ठरवणार. यातच कोणी संगीतकार, कोणी कलाकार, कोणी सामाजिक कार्यकर्ता किंवा कोणी डिप्लोमॅट असो, त्याबाबतही सरकार निर्णय घेणार. यातच एखादं परदेशी विद्यार्थी शिष्टमंडळ किंवा एखादा पत्रकार देशात येतो, त्यांना देशातील प्रमुख नेत्यांची भेट घ्यायची असेल, त्यांना जर सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी किंवा उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची असेल तर, त्यांना सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल. यातच सरकारने परवानगी दिली तरच ते भेटू शकतात. पण सरकारने परवानगी नाकारली तर त्यांना भेटता येणार नाही. अशा प्रकारे अनेक तरतुदी या कायद्यात आहेत. म्हणून मी म्हणतोय की, तुम्ही येथे तुरुंग बनवू इच्छित आहेत. तुम्ही हे विधेयक स्थायी समितीकडे परत पाठवावे आणि आणि पुन्हा यावर चर्चा करावी, असंही ते म्हणाले.