राज्यातील पोलीस खातं भ्रष्टाचारानं बरबटलेलं; खाकी वर्दीत निर्जीव लोक! संजय राऊत यांचा संताप

बदलापूरमध्ये लहान मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेतील पीडित मुलीचे पालक 12 दिवस फिरत होते. पण पोलीस गुन्हा नोंदवायला तयार नव्हते. या घटनेबाबत मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर भाष्य केले आहे. मुलींवर, महिलांवर अत्याचार होत असताना राज्यकर्ते डोळे बंद करू बसले असेल आणि अत्याचाराची ही मालिका सुरुच राहणार असेल तर सरकारला राज्य करण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका उच्च न्यायालयाने मांडली. या घटनेत पोलीसही तितकेच जबाबदार असून पोलीस खाते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

गुन्हा घडल्यावर त्याची नोंद करून घेणे पोलिसांचे काम आहे. मात्र आमची संस्था बदनाम होईल म्हणून असा गुन्हा नोंदवण्यापासून कोणाला रोखले जात असेल आणि पोलीसही दबावात मदत करत असतील तर हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. या संपूर्ण घटनेत पोलीसही जबाबदार आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर येथे पोलीस नसून मिंधे गँगचे सदस्य आहेत. हे खाकी वर्दीतील निर्जीव लोक आहेत. मुख्यमंत्री आणि त्यांची मोजकी लोकं सांगतील तोच कायदा काही काळापासून सुरू आहे. अनेक जिल्ह्यात पोलिसांना घरगड्यासारखे वागवले जात असून यामुळेच अराजक निर्माण होते, असा घणाघात राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना गरज नसतानाही केंद्राने सुरक्षा दिली. याचा अर्थ केंद्रीय गृहमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास नाही. महाराष्ट्राचे पोलीस हे आमच्या मुलींचे रक्षण करू शकत नाही, त्याच पद्धतीने आमच्या नेत्यांचेही रक्षण करू शकत नाही यावर केंद्रानेच मोहोर उमटवली.

माझ्या दौऱ्यांची खबर ठेवण्यासाठी झेड प्लस सुरक्षा दिली असेल! – शरद पवार

राज्याच्या पोलीस महासंचालिका जाहीरपणे सांगतात की मी संघाची कार्यकर्ती आहे. अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुका त्यांच्या कुटुंबात संघाची पार्श्वभूमी आहे की नाही हे पाहून करण्यात आल्या. कर्तव्यदक्ष पोलिसांची ही पात्रता असेल तर इतर पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निराशा आणि नाराजी पसरणारच. राज्यातील पोलीस खाते हे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. पैसे दिल्याशिवाय बदली आणि बढती होत नाही. टेंडरला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने मुंबई आणि ठाण्यातील पोलिसांच्या बढत्या, बदल्या थांबलेल्या आहेत. असे असल्यावर बदलापूर, कोल्हापूर, अंबरनाथ सारख्या घटना घडणारच. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा काटा काढण्यासाठी, खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस गुंतवणूक ठेवले आहेत. राज्यात कायदा कुठे आहे? असा सवालही राऊत यांनी केला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सर्वोच्च राजकीय शिखरावर असताना आयबीकडून त्यांनाही इथे जाऊ नका, तिथे धोका आहेत असे इशारे दिले जायचे. ज्या नेत्याची लोकप्रियता आहे, जो आपला पराभव करू शकतो त्याला कुठेतरी अडकवून ठेवायचे. त्याच्या मनावर दबाव आणायचा. त्याची इथ्यंभूत माहिती घेण्यासाठी अशा प्रकारच्या सुरक्षेची व्यवस्था असते, असेही राऊत यावेळी म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)