
“जो पाखंडी आणि कपटी असतो तो हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो”, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. आज नाशिकमध्ये शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निर्धार शिबीर पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही टीका केली आहे.
निर्धार शिबिरात कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजय राऊत म्हणाले की, “आज निर्धार शिबिराचा समारोपाचा कार्यक्रम आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करतील. आपले लोक मलाही म्हणाले की, तुम्हीही मार्गदर्शन करा. मी म्हणालो मी काय मार्गदर्शन करणार, मगाशी आपण ज्यांची चित्रफीत पाहिली, ज्यांचं दर्शन आपण घेतलं, ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मार्ग दाखवणारे उद्धव ठाकरे आहेत. मी उद्धव ठाकरे यांना फक्त इतकंच सांगू इच्छितो की, हे संपूर्ण शिबीर नाशिकच्या शिवसैनिकांच्या मेहनतीने पार पडलं आहे. यांनी तन, मन आणि धन अर्पण करून हे शिबीर यशस्वी केलं आणि ही शिवसेनेची ताकद आहे. आज आपल्याकडे सत्ता नाही, त्यामुळे असे कार्यक्रम कसे होऊ शकतात, असा प्रश्न पडतो. पण एकदा शिवसैनिकांनी मनावर घेतलं तर, असे 100 सोहळे तो पार करू शकतो.”
संजय राऊत म्हणाले, “अडथळे बघा कसे आणले जातायंत. इथं आपलं शिबीर सुरु आहे आणि बाहेर नाशिक शहरात भारतीय जनता पक्षाने दर्गे पाडण्याचं काम घेतलं आहे. का, तर शहरात गोंधळ व्हावा. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हाव्ही आणि टीव्हीवर आपल्या बातम्या दिसू नयेत. म्हणून त्यांनी आजचा मुहूर्त काढला. पण त्या सगळ्यांवर पुरून उरून आजचा सोहळा होत आहे आणि दिवसभर महाराष्ट्रात आपल्या शिबिराची बातमी होत आहे.”
‘खराब काळाशी सामना करणारी जी व्यक्ती असते, ती सगळ्यात उज्वल भविष्याचा निर्माता होतो’
राऊत म्हणाले, “अनेकांना वाटलं की, शिवसेनेचा पराभव झाला तर, शिवसैनिक खचला असेल, घरी बसला असेल. शिवसैनिक आता घराबाहेर पडणार नाही. शिवसैनिक दहशतीखाली आहे. मात्र आजच्या शिबीराने दाखवून दिलं की, नाशिकचा शिवसैनिक आहे तसाच दणदणीत आणि खणखणीत आहे. एखाद, दुसऱ्या पराभवाने खचून जाणारे आम्ही नाही. यापेक्षा वाईट काळ आम्ही पाहिला आहे, स्वतः शिवसेनाप्रमुखांनी अनुभवला आहे. सगळ्यात खराब काळाशी सामना करणारी जी व्यक्ती असते, ती सगळ्यात उज्वल भविष्याचा निर्माता होतो. यामुळे कोणाला असं वाटत असेल की, आम्ही खचलो आणि दबलो तर, तसं नाहीय.”
ते म्हणाले, एक ‘छावा’ नावाचा चित्रपट येऊन गेला. त्यामध्ये आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा संघर्ष पाहिला. तोच संघर्ष आपल्या वाटेला आला आहे. त्या काळात कवी कलश कवी होते. छत्रपती संभाजी महाराज जेव्हा निराश झाले, चारीबाजूने घेरले गेले. काय करावं असा जेव्हा त्यांना प्रश्न पडला, तेव्हा कवी कलश यांनी त्यांना एक मंत्र दिला, जो आपल्या शिवसैनिकांसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. कवी कलश छत्रपती संभाजी महाराजांना सांगतात…
मन के जीते जीत है, मन के हारे हार,
हार गए जो बिन लढे, उन पर है धिक्कार,
उन पर है धिक्कार जो देखे ना सपना,
सपनो का अधिकार,असल अधिकार है अपना,
तू भोर का पहला तारा है,परिवर्तन का एक नारा है,
यह अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है.
आपल्यालासुद्धा याच मार्गाने जायचं आहे. छत्रपती संभाजी महाराज लढले. त्यांनी परिवर्तनाची एक दिशा दाखवली, संघर्ष केला. त्यातूनच महाराष्ट्र उभा राहिला आणि परिवर्तन करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे, असंही ते म्हणाले.
‘ईव्हीएम (EVM) हायजॅक होतंय आणि ईव्हीएममुळे निकाल बदलले जाऊ शकतात’
संजय राऊत पुढे म्हणाले की, “नाशिकच्या पराभवावर चर्चा झाली. नाशिकचा पराभव का झाला, आपण खूप विश्लेषण केलं. नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण वॉशिंग्टनमध्येही झालं. आपण म्हणतो का हरलो.. पण नाशिकच्या पराभवाचे खरे विश्लेषण वॉशिंग्टनमध्ये झालं. तुलसी गॅबार्ड, यांचं नाव लक्षात ठेवा. या सध्या बाई नाहीत तर, पंतप्रधान मोदी यांच्या बहीण आहेत. मोदी त्यांना ‘सिस्टर तुलसी’ म्हणतात. आता मोदी अमेरिकेला गेले होते, तेव्हा जाताना इथून कुंभ स्नानासाठी जे गंगाजल त्यांनी सगळ्यांना पाठवलं. ते गंगाजल घेऊन मिस्टर नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले आणि तुलसी गॅबार्ड यांना सुपूर्द केलं. या तुलसी गॅबार्ड ट्रम्प सरकारमध्ये गुप्तचर विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांनी परवा सांगितलं की, ईव्हीएम (EVM) हायजॅक होतंय आणि ईव्हीएममुळे निकाल बदलले जाऊ शकतात. मोदींच्या बहिणीने सांगितलं आहे. त्यांच्या हातात गंगाजल आहे, त्या खोटं बोलणार नाहीत. ईव्हीएममधून निकाल फिरवले जातात, हे जेव्हा वॉशिंग्टनमध्ये बसून तुळसी गॅबार्ड सांगतात, तेव्हा महाराष्ट्राचा निकाल हा अशा पद्धतीने का लागला, याचं उत्तर जगाला मिळतं. मग आम्हाला वाटतं की, नाशिकमध्येच नाही, महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात 10 वर्षांपासून काय चाललं आहे. खरं तर, आजच्या या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी तुलसी गॅबार्ड यांनाच बोलवायला हवं होतं. तुलसी गॅबार्ड यांना आपण पुढच्यावेळी विधानसभेच्याआधी बोलवू आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन करा म्हणू.”
‘उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला आम्ही सज्ज आहोत’
नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करत राऊत म्हणाले, “नरेंद्र मोदी आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही कधी हिंदू झालात? एक सुंदर वाक्य आहे, ‘जो जितका पापी, पाखंडी आणि कपटी असतो, तो हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो. आम्ही ते करत नाही, आम्हाला बाळासाहेबांनी बाळकडू दिलं आहे. आजच्या शिबिरात तोच एक संदेश आहे की, आम्ही लढायला तयार आहोत. तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करा. आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला आम्ही सज्ज आहोत. आम्ही आमच्या नेत्याच्या मागे महाराष्ट्रात आणि देशात ठामपणे उभे राहू आणि तुमचं जे ढोंग आणि पाखंड आहे, हे उघडं पाडू.”
‘ते पुन्हा गावाला गेलेत, आता पौर्णिमा, अमावस्या आली की भिती वाटते’
संजय राऊत, “ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी आणि चष्मा. आज हे महाशय परत गावी गेले आहेत. मला आता भीती वाटते आज पौर्णिमा, अमावस्या आहे की, काय? कोणाचा बकरा कापणार आहे? आता महाराष्ट्राला पौर्णिमा, अमावस्या आली की, भीती वाटते. इतका अंधश्रद्धाळू हा महाराष्ट्र कधीही झाला नव्हता. हा महाराष्ट्र पुरोगामी आहे. फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाळासाहेबांचा हा महाराष्ट्र आहे.”