महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर गुरुवारी मनसे नेते राज ठाकरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. निवडणुकीत लोकांनी मतदान केले, पण मतदान गायब झाले असे म्हणत त्यांनी ईव्हीएमवर हल्ला चढवला. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. निवडणुकीत झालेलं मतदान कुठे गेलं? हे एक रहस्य आहे. चौदाशे मतांच्या गावात राजू पाटील यांना एकही मतं पडू नये हे संशयास्पदचं आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर फडणवीसांनी उत्तरे द्यावी. मोदींनी, अमित शहांनी देखील ही जादू कशी झाली हे सांगितले पाहिजे, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला. मुंबईत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केले.
निवडणुकीत जनतेने दिलेली मतं कुठे गेली? कुठे गायब झाली ते कळत नाहीए. ते एक रहस्य आहे. ज्या प्रकारे माणसं फोडली जातायत ते सुद्धा एक रहस्यच आहे. भाजपसोबत सख्खे असलेले किंवा एकनाथ शिंदेसोबत सख्खे असलेले राज ठाकरेसुद्धा ही भूमिका मांडतायत. त्यांनी एक उदाहण दिलं, राजू पाटील यांच्या गावात चौदाशे मतं आहेत. आणि चौदाशे मतांच्या गावात राजू पाटील यांना एकही मतं पडू नये हे संशयास्पदचं आहे. अशा तक्रारी गावागावतून आलेल्या आहेत. ज्या गावात त्या नेत्याचं प्रभाव आहे, तिथे त्यांना एकही मतं पडू नये यासारखं रहस्य कोणतं असू शकतं. नरेंद्र मोदी रहस्य भेदक जादूगार आहेत. मोदींनी, अमित शहांनी, फडणवीसांनी ही जादू कशी झाली हे सांगायला पाहिजे. राज ठाकरेंच्या या प्रश्नांची उत्तरे देवेंद्र फडणवीसांनी, निवडणूक आयोगाने दिली पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
‘गंगेत तुम्ही कितीही डुबक्या मारल्या तरी तुमची पापं धुतली जाणार नाहीत’
राजकारणात जर कोणी चांगली भूमिका मांडत असेल, मग ते आमचे राजकीय विरोधक जरी असले, तरी त्या भूमिकेकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे. या देशात अनेक लोक इव्हीएमवर भूमिका मांडत आहेत. फोडाफोडीच्या राजकारणावर बोलत आहेत. अशी कोणती जादू आहे, ज्यामुळे लोक त्यांच्याकडे जातायत. असं काय महान कार्य केलंय त्यांनी या महाराष्ट्रात आणि पक्ष संघटनेत? ही संघटना माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे. याच संघटनेनं या सगळ्याला जन्म दिलेला आहे. तुम्ही आपल्या आईला सोडून जेव्हा जाता तेव्हा एक लक्षात घ्या, गंगेत तुम्ही कितीही डुबक्या मारल्या तरी तुमची पापं धुतली जाणार नाहीत, असा टीका संजय राऊत यांनी सरकारवर केली आहे.
‘सातत्याने भूमिका बदलून चालणार नाही’
माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, शरद पवारजी असतील, अन्य कोणी असतील त्यांचा कालखंड वेगळा होता. तेव्हाचे प्रसंग आणि घडामोडी वेगळ्या होत्या. आज महाराष्ट्र संकटात आहे. आज हे राज्य खतम करण्यासाठी दिल्लीत प्रयत्न सुरू आहेत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनाच खतम करायची, संपवायची. ठाकरे ब्रँडच संपवायचा पूर्णपणे. या राज्यात ठाकरे नावाला या राज्यात वलय आणि ताकद आहे, त्याच्या विरोधात दिल्लीची सत्ता उभी आहे. अशा वेळेला सातत्याने भूमिका बदलून चालणार नाही. आधी महाराष्ट्र वाचवायला पाहिजे, मराठी माणसाचं अस्तित्व वाचवायला पाहिजे. ही भूमिका महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षाने घेणं गरजेच आहे. मग ते भाजपचे असू दे, शिंदे गटातले असू दे किंवा अजित पवार गटातले असू दे.. महाराष्ट्राच्या पलीकडे राजकारण नाही, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.