ज्यांनी महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केला त्यांना संधी मिळाली तरी भेटणार नाही, संजय राऊत यांनी सुनावले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नुकतीच भेट झाली होती. या भेटीत तब्बल 15 मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी थेट, ज्यांनी महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केला त्यांना संधी मिळाली तरी भेटणार नाही, असे कडक शब्दात सुनावले आहे.

”जी लोकं आम्हाला सोडून गेले आम्ही त्यांच्या वाऱ्यालाही फिरकत नाही. ज्या प्रकारे त्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्या आसपाससुद्धा जात नाही. यांचं बरं असतं यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असतं, विद्या प्रतिष्ठान असतं. या सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते, आमच्याकडे असं काही नाही. त्यामुळे आमच्या भेटी गाठी कुणाशी होत नाही आणि होण्याची वेळ आली तरी आम्ही टाळतो. राजकारणात संवाद ठेवला पाहिजे अशा दांभिक गोष्टींवर आमचा विश्वास नाही. ज्यांनी आमचा पक्ष फोडला, ज्याने महाराष्ट्राशी बेईमानी केली, महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी महाराष्ट्राच्या शत्रुपुढे गुडघे टेकले त्यांना कितीही संधी असली तरी भेटणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी ”आम्ही फाटकी माणसं आहोत रस्त्यावरची. आमच्याकडे संस्था वगैरे नाही. आम्ही भांडत राहू, लढत राहू व धडा शिकवू, असे देखील म्हणाले.