जागतिक स्तरावर भूगर्भात नरेंद्र मोदींविरोधात हालचाली सुरू आहेत म्हणूनच… – संजय राऊत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथील निर्धार शिबीराच्या तयारीचा मंगळवारी आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजप व सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला.

सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे नाव ईडीने डेक्कन हेराल्डप्रकरणाच्या चार्जशीटमध्ये असल्याबाबत विचारले असतात सध्या जागतिक स्तरावर मोदींविरोधात काहीतरी हालचाली सूरू असून त्यामुळेच हे सर्व सुरू आहे. ”नरेंद्र मोदी व अमित शहा आणि त्यांच्या सरकारच्या पायाखालची वाळू सरकतेय. जागतिक स्तरावर नरेंद्र मोदींविरोधात भूगर्भात काहीतरी हालचाली सुरू आहे. त्याशिवाय ट्रम्प प्रशासनातील प्रमुख पदावरच्या तुलसी गबार्ड यांनी भारतातील निवडणूकीचा निकाल बोगस आहे सांगितलं नसतं. ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणूका या घोटाळा आहे हे त्यांनी सांगितले नसते. आता हे सांगण्याची गरज नव्हती पण त्यानी सांगितले”, असे संजय राऊत म्हणाले

”नाशिक शहरात मशाल आणि भगवे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना नव्या उभारीने पुढे जात आहोत. विधानसभा निवडणूकीचे निकाल आम्ही विसरलेलो आहोत. पण लढाई चालू आहे. हा पराभव नाही. हा घातपात आहे. त्यामुळे आम्ही पुढल्या तयारीला लागलो आहोत. मी बाळासाहेबांसोबत अख्ख आयुष्य काम केलंय. त्यांच्यासोबत सातत्याने राहिलोय. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार सामान्यांपर्यंत पोहचले पाहिजे. ते मी कायम लिखाणातून, चित्रपटातून लोकांपर्यंत पोहचवत आलोय, असंही संजय राऊत यांनी सांगितले.

”आम्ही काँग्रेस सोबत गेलो याचा कुणाला त्रास होत असेल तर त्याने काँग्रेसने मिळवलेल्या स्वातंत्र्याचा त्याग केला पाहिजे. काँग्रेसने मिळवलेलं स्वातंत्र्य तुम्ही भोगताय. जे हे सगळं बोलतायत ते स्वातंत्र्य लढ्यात कुठेच नव्हते. फासावर काँग्रेसचे लोकं गेले. ते स्वातंत्र्य तुम्ही फुकटात उपभोगताय, लुटताय, मजा मारताय. आणि आम्ही काँग्रेससोबत सहभागी झालो म्हणून तुम्हाला त्रास व्हायचं कारण नाही. स्वातंत्र्यात कुणाचा सहभाग नव्हता तो भाजप व संघाचा नव्हताटट, असेही ते म्हणाले.