
आज संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहाने आणि जल्लोशात साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी केली जाणार आहे. तसेच मंत्री नितेश राणे मोठी मिरवणूक काढणार आहेत. यावर महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार करणारे आज मिरवणुका काढतायत, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
छत्रपती शिवाजी महाराजांची मिरणूक ही प्रत्येक ठिकाणी निघायलाच पाहिजे. अमेरिकेत पण निघते. कॅनडात निघते, इंग्लंडमध्ये निघते. त्यासाठी कोणी इथून जायची गरज नसते. लोक उस्फुर्तपणे मिरवणुका काढतात. पण ज्या पद्धतीने पुतळ्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला. आणि तो भ्रष्टाचार करणारे हेच लोकं होते. ते आज मिरवणुका काढतात. हेच सरकार होतं. यांच्या काळात भ्रष्टाचार झाला. आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा एका क्षणात कोसळून खाली पडला. महाराष्ट्राचं मन त्या दिवशी दु:खी झालं, त्या दु:खात महाराष्ट्र अखंड राहिला. आणि आज परत तुम्ही नव्याने पुतळा करताय. पण जे झालं त्याची जवाबदारी कोणी घेतली नाही, असे संजय राऊत म्हणाले.
मालवणच्या या घटनेवर तेव्हा निषेध करायला आमचे लोकं गेले, त्या रस्त्यात हे आडवे आले. छत्रपतींचा पुतळा ज्या पद्धतीने पडला किंवा पाडला भ्रष्टाचारीने त्याचा निषेध करायलाही या लोकांनी दिला नाही. आणि तिथे रस्त्यावर राडे केले. छत्रपतींच्या विचाराला हे अपेक्षित नाही. या राज्यात मालवणच्या किनाऱ्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा उद्ध्वस्थ झाला. या राज्यात राज्यकर्त्यांकडून छत्रपतींते विचार उद्ध्वस्थ झाले. या राज्यात छत्रपतींना जी अपेक्षित भूमिका होती, त्या दिशेने आज कोणी जाताना दिसत नाही, हे दुर्दैव आहे, अशी खंत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.
“छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही”
छत्रपती शिवाजी महाराजांनी पण राजकारण केलं. छत्रपती शिवाजी महारांजाकडून प्रेरणा घेऊन आम्ही राजकारण करतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी बडेजाव केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातसुद्धा लोकशाही होती. जरी त्या काळात निवडणुका नसल्या, निवडणूक आयोग नसला, गृहमंत्री नसला तरी लोकशाही होती. यालाच आम्ही शिवशाही म्हणतो, असे राऊत म्हणाले.
“आम्ही सगळ्यांनीच महारांचा इतिहास समजून घेतला पाहिजे”
आता जे शिवाजी महाराजांचा सन्मान करायला रायगडावर गेले आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेतला पाहिजे. त्यांनीच नाही आम्ही सगळ्यांनीच महाराजांचा इतिहास समजून घेतला पाहिजे. आणि त्यानुसार आचरण केलं पाहिजे. निवडणुका आल्या की आम्ही छत्रपतींच्या मार्गाने जाणारं. छत्रपतींवर विश्वास ठेवणार, हे निवडणुक आल्यावर आपण सांगतो. पण छत्रपतींनी राज्यकारभाराची आचारसंहिता निर्माण केली, त्या पावलांवरती पाऊल ठेवून आज कोणतही राज्य दिल्लीचं असेल किंवा महाराष्ट्राचं असेल हे चाललं नाही.
आज छत्रपतींच्या स्मरणाचा दिवस आहे. आम्ही रोजचं त्यांच स्मरण करतो. आमचा पक्ष शिवसेना हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच स्थापन झालाय. महाराष्ट्रात जागोजागी ज्या शिवजयंत्या आम्ही साजऱ्या करतो. ती सुरूवात शिवसेनेने केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी केलेली आहे. प्रत्येत शाखेची, मंडळाची शिवजयंती हे लोकमान्य टिळकांनंतर मोठ्या प्रमाणात जर कोणी केलं असेल तर ते हिंदुहृदसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं, असंही संजय राऊत म्हणाले.