…नाहीतर आम्हाला आमचा खेळ सुरू करावा लागेल, संजय राऊत यांचा इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वणी येथे निवडणूक आयोगाने बॅगा तपासल्या. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप मिंधे सरकारला व निवडणूक आयोगाला फटाकरले आहे. तसेच ‘ हे जे खेळ चालले आहेत ते बंद करा नाहीतर आम्हाला आमचा खेळ सुरू करावा लागेल’, असा थेट इशारा संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.

”खेड शिवापूर टोल नाक्यावर एका गाडीत 15 कोटी सापडले पण दाखवताना 5 कोटी दाखवले. ते पैसे ज्याचे होते त्याचं नाव समोर आलंच नाही. हे जे खेळ चालले आहेत ते बंद करा नाहीतर आम्हाला आमचा खेळ सुरू करावा लागेल. याआधी लोकसभेला आमच्या बॅगा तपासल्या. आता या पुढेही करतील. जर तुम्ही सर्वांना नियम सारखा लावणार असाल तर आम्हाला हरकत नाही. पण तुम्ही जर तुमच्या स्टाफला फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वाहनांची तपासणी करा असं ट्रेनिंग दिलं असेल तर आम्हाला त्याबाबत गांभिर्याने विचार करावा लागेल, असे संजय राऊत म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती आणि विराट प्रचार सभा होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद आणि होणारी गर्दी पाहून सत्ताधाऱ्यांना धडकी भरली आहे. हे अधोरेखित करणारा प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे घडला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.