एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते. शिंदे यांनाच देवेंद्र फडणवीस अटक करणार होते. म्हणून अटकेला घाबरून शिंदे पळून गेले. हे डरपोक लोक आहेत, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला तसेच देवेंद्र फडणवीस हे नखशिखांत भ्रष्टाचारी आहेत, असाही हल्लाबोल त्यांनी केला.
अकोले येथे आज शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची सभा झाली. याआधी त्यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस, लाड, प्रविण दरेकर या भाजप नेत्यांना अटक करण्याची योजना आखली होती असे विधान नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्याचा जोरदार समाचार संजय राऊत यांनी घेतला. यावेळी शिवसेना नेते अनिल देसाई, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि शिवसेना पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते.
फडणवीस, दरेकर, लाड यांच्या गुन्ह्यांचा तपास का थांबवला?
पंतप्रधान मोदींनी विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना अटक केली. मग शिंदे ज्यांची नावे घेतात त्या फडणवीस, दरेकर, लाड यांच्यावरील गुन्ह्यांचा तपास तुम्ही का थांबवलात, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
ईव्हीएमविरोधात जनतेमध्ये आक्रोश
ईव्हीएमविरोधात जनतेच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे एक प्रकारचा जनआक्रोश निर्माण झाला आहे. लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करताहेत. अनेकदा न्यायालयाने जनभावनेचा आदर केला आहे. मात्र, ईव्हीएम विरोधातील जनआक्रोश न्यायालयापर्यंत पोहोचला नाही. न्यायालयाने हा विषय काळजीपूर्वक समजून घ्यायला हवा होता, असे संजय राऊत म्हणाले.
‘त्या’ मंगळसूत्रांचा हिशोब कोण देणार?
देशातील महिलांचे मंगळसूत्र तुमच्यामुळे धोक्यात आले आहे. तुम्ही देश विकायला काढलात. तुमच्या उपद्रपांमुळे महिला, माता भगिनींना आपली मंगळसूत्रे गहाण ठेवावी लागली. विकावी लागली आहेत. बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण या महत्त्वाच्या गोष्टींसाठी गेल्या दहा वर्षात आपल्या मुलाबाळांसाठी मंगळसूत्र गहाण ठेवावे लागले. देशाच्या सीमेवर आणि काश्मीरसारख्या राज्यात दहा वर्षात हजारो सैनिक मृत्युमुखी पडले. त्या वीर पत्नींच्या आणि वीर मातांच्या मंगळसूत्रांचा हिशोब कोण देणार, असा सवाल करत महिलांच्या मंगळसूत्रांवर बोलणारा भाजप, हाच ‘मंगळसूत्र चोरांची टोळी’ आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी अकोले येथे झालेल्या सभेत भाजपला फटकारले.