शंकराचार्यांचं मत ऐकून काहींच्या पोटशूळ उठला असेल, संजय राऊत यांचा टोला

ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सोमवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्यांचे सहकुटुंब आशीर्वाद घेतले. या भेटीनंतर शंकराचार्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील सरकार पाडले हा जनमताचा अनादर आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोठा विश्वासघात झाला, त्याबद्दल आपल्या मनात मोठे दुःख आहे, उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होवोत, अशा भावना शंकराचार्यांनी यावेळी व्यक्त केल्या. याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी मिंधे गटाला टोला लगावला आहे. ‘शंकराचार्याचं मत ऐकून काहींच्या पोटशूळ उठला असेल’, असे ते म्हणाले.

”ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे मुंबईत होते. त्यांच्या मुंबई दौऱ्यात ते सोमवारी मातोश्रीवर आलेले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वास्तूत येण्याची त्यांची इच्छा होती व उद्धव ठाकरेंना भेटायचं होतं. काल ते त्यांच्या शिष्यासंह मातोश्रीवर आले. तिथे हिंदू परंपरा रितीरिवाजानुसार त्यांचं स्वागत करण्यात आलं. धार्मिक शिष्टाचाराने जसं त्यांचं स्वागत व्हायला हवं तसंच त्यांचं स्वागत केलं गेलं. शं‍कराचार्यांनी उद्धव ठाकरे, ठाकरे परिवाराला व शिवसेनेला आशीर्वाद दिले. काही काळ चर्चा केली व त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंबरोबर विश्वासघात झाला आहे व हिंदू धर्मात विश्वासघाताला स्थान नाही. विश्वासघाताने त्यांचा पक्ष फोडला, त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं. विश्वासघाताला हिंदु धर्मात स्थान नाही हे हिंदूधर्माचे धर्मगुरू सांगतायत. हे ऐकून काही लोकांच्या पोटात पोटशूळ उठला असेल. त्यांना हिंदु धर्माचे शिखर पुरुष धर्मगुरुंचे मत मान्य नसेल. आता ते शं‍कराचार्यांना खोटं ठरवणार असतील तर त्याविषयी मला आश्चर्य वाटणार नाही. कारण त्यांचा संपूर्ण डोलाराच खोट्यावर उभा आहे. दोन दिवसांपूर्वी एका सोहळ्यात याच शं‍कराचार्यांसमोर झुकून नरेंद्र मोदींनी त्यांचा आशीर्वाद घेतला होता. न्यायालयात आमचा घटनाबाह्य सरकारविरोधात खटला सुरू आहे. तो चालेल तेव्हा चालेल. पण आदरणीय शं‍कराचार्यांनी आम्हाला जो आशीर्वाद दिला व आमच्यावरच्या अन्यायासंदर्भात जी खंत व्यक्त केली ती आमच्यासाठी मोठी आहे. बाळासाहेबांनी स्थानप केलेली व उद्धव ठाकरे ज्याचं नेतृत्व करत आहेत त्या शिवसेनेचा ज्या प्रकारे तुकडा पाडला त्याला हिंदुत्व म्हणता येणार नाही हा हिंदुचा विश्वासघात आहे असे शंकराचार्य म्हणाले. शंकराचार्य हे हिंदु धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू आहे. त्यांना त्यांचे मत मांडायचे अधिकार आहेत. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवेळीही त्यांनी आपलं स्पष्ट मंत मांडलं होतं. शं‍कराचार्यांनी जर उद्धव ठाकरेंना आशीर्वाद दिला आहे तर त्यासाठी कुणालाही दुख व्हायला नको, असे संजय राऊत म्हणाले.