मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणूकी महायुतीचा स्ट्राईक रेट चांगला असल्याचा दावा केला होता. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ”महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या बेईमानीचा स्ट्राईकरेट जास्त चांगला असल्याची’, टीका संजय राऊत यांनी केली आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी मिंधे, भाजप व निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.
”मुख्यमंत्र्यांचा बेईमानीचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रात चांगला आहे. पैशांनी स्ट्राईक रेट विकत घेता येतात. ते त्यांनी केले. आमच्या काही जागा हातातोंडाशी आलेल्या होत्या. उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेवर यांनी दरोडा घातला. हा तुमच्या खोक्यांच्या स्ट्राईक रेट आहे. जनतेचा स्ट्राईक रेट नाही. देशभरात शंभरापेक्षा जास्त जागा या पाचशे ते हजारच्या फरकाने भाजपने जिंकलेल्या आहेत. तिथे दबाव आणून विजय मिळवलाय भाजपने. धुळ्याची जागा विजयी घोषीत करावी अशा प्रकारचा दबाव केंद्रातून सतत होता. सात ईव्हीएम मशीनची मतगणना बाकी असताना अशा प्रकारचा दबाव केंद्रातील वरिष्ठ सत्ताधाऱ्यांनी टाकला. या सगळ्यासाठी निवडणूक आयोग जबाबदार आहे. सगळ्यात आधी निवडणूक आयोगावर कारवाई करायला हवी. ज्या दिवशी सरकार कोसळेल तेव्हा पहिली कारवाई ही निवडणूक आयोगावर करू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.