
दिल्लीतील मुघलांशी हातमिळवणी करून महाराष्ट्राचा विध्वंस करायला निघालेल्यांना संपवण्याची ताकद शिवसेनेत आहे, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊक यांनी रामदास कदम यांना दिला आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी मिंधे गटाला जोरदार फटकारले आहे.
”आमच्या सारखी लोकं पक्षासोबत इमानेइतबारे राहिली आहेत. दिल्लीच्या मुघलासोबत हातमिळवणी करून महाराष्ट्राचा विध्वंस करायला निघालेल्यांना संपवण्याची ताकद शिवसेनेत आहे, हे फडफडणं तात्पुरता आहे. सत्ता आहे म्हणून हे फडफडणं आहे. एकदिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या शिवसेनेच्या दारात उभं राहावं लागेल. हे माझं भाकित नसून दावा आहे, असे संजय राऊत म्हणाले.
तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री असताना झालेल्या घोटाळ्यावर बोलताना संजय राऊत यांनी मिंधे गटावर टीकास्त्र सोडलं. ”शिंदेंच्या काळात जी कामं झाली ती कामं नसून भ्रष्टाचार आहे. त्यावेळी जे आरोग्यमंत्री होते त्यांचे किती घोटाळे समोर आले ते आपल्याला माहीत आहे. म्हणूनच त्यांना पुन्हा मंत्री करायला भाजपचा विरोध होता. सार्वजनकि आरोग्य खातं जे खातं थेट गोर गरिब जनतेशी संबंधित आहे तिथे घोटाळा करता. जनतेच्या पैशात, औषध खरेदी घोटाळा होणार असेल तर हे कसलं राज्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जर ते हे सगळं थांबवणार असतील तर व आधीचा भ्रष्टाचार कसा झाला ते सांगणार असतील तर आम्ही त्याचं स्वागत करतो. त्यांच्या प्रत्येक कृतीचे आम्ही स्वागत करतो, असे संजय राऊत म्हणाले.
माणिकराव कोकाटे व धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, ”माणिकराव कोकाटे कायद्याने अपात्र ठरलेले आहेत. त्यांची मंत्रीपद टिकवायची धडपड सुरू आहे. सुनील केदार यांची 24 तासात आमदारकी गेली, राहुल गांधी यांची खासदारकी गेली. उत्तर प्रदेशात आझम खान यांची आमदारकी गेली. मात्र इथे स्वत:चा बचाव करण्याची पूर्ण संधी दिली जातेय. माणिकराव कोकाटे व धनंजय मुंडे या दोन्ही नेत्यांना अभय दिलं जातंय. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय. अजुनही आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायालय यांना सोडणार नाही.”
”स्वारगेट बलात्कार प्रकरण न्ययप्रविष्ट त्यावर आता बोलणं योग्य नाही. मात्र गृहराज्यमंत्र्यांनी या गंभीर प्रकरणाला वेगळ्या पायवाटा फोडलेल्या आहेत. ते म्हणतात मुलीने स्ट्रगल केलं नाही. स्ट्रगल केलं नाही म्हणजे नक्की काय असतं, विरोध केला नाही, हाणामारी केली नाही. मग तुम्ही मुलींना प्रशिक्षण द्या. मुलींनी अशा वेळी काय करायला हवे याचे प्रशिक्षण द्या. मुलीने प्रतिकार केला नाही असे म्हणणारे राज्याचे गृहराज्यमंत्री असंवेदनशील आहेत. राज्याला असे मंत्री मिळाले आहेत हे दुर्दैव आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.