‘हे’ अत्यंत चिल्लर लोकं, संजय राऊत यांचा मिंध्यांवर घणाघात

ए खून के प्यासे बात सुनो’ ही कविता बॅकग्राऊंडला असलेली व्हिडीओ क्लिप पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्तवपूर्ण मत व्यक्त करत त्यांच्यावरील गुन्हा रद्द केला. ‘विरोधी मत, व्यंग हा गुन्हा नाही! अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण झालेच पाहिजे, असे मत सर्वोच्च न्यायलयाने व्यक्त केले. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे व भाजपला फटकारले आहे.

”इम्रान प्रतापगढी यांनी जे गाणं केलं होतं ते गुजरातच्या स्थितीवर होतं, त्याच्यावर गुजरातमध्ये गुन्हा दाखल झाला. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलं ते अत्यंत महत्वाचं आहे. कुणाल कामराच्या प्रकरणाबाबतही हेच घडलं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की एका कवितेमुळे, परखड भाष्यामुळे, रंगामुळे सरकार, राजकारण्यांना अस्वस्थ व्हायचं कारण नाही. हा प्रत्येकाचा अधिकार आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. अशाप्रकारे गुन्हे दाखल करणं, दहशत निर्माण करणं आणि धमक्या देणं हे योग्य नसल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं. ते मत ज्यांनी कुणाल कामाराला एकनाथ शिंदे यांची माफी मागा असा कायद्याच्या पलिकडे जाऊन सल्ला त्या मुख्यमंत्र्यांनी व ज्यांनी स्टुडिओ फोडला त्यांनी ऐकायला हवं. ज्यांना न्यायाची बूज असेल तर हा निकाल ऐकावा. कारण या महाराष्ट्रात व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुडदा पडलाय. एकप्रकारे गुजरात, उत्तर प्रदेश पॅटर्न इथे राबवला जात आहे. महाराष्ट्र थोडा वेगळा असं वाटलं होतं पण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी तोच मार्ग निवडला आहे. अजित पवार यांना ते मान्य नाही. त्यांचा मार्ग वेगळा आहे. मात्र अजित पवार त्यांच्या कैदेत अडकले आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केला.

”कुणाल कामराशी मी बोललो. मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरे जायला पाहिजे. हा देश घटनेनुसार चालतो. अभिव्यक्तीस्वातंत्र्यात असे हल्ले आपल्याला सहन करावे लागतात. कुणालला जर तुम्ही तुमचे शत्रू मानत असाल तर या महाराष्ट्राला वाटतंय की अमित शहा आणि नरेंद्र मोदी देशाचे शत्रू आहेत, त्यांच्या पायाशी जाऊन एकनाथ शिंदे बसले आहेत. तुमच्यावर टीका केली म्हणून कुणाल कामरा देशाचे शत्रू ठरू शकत नाही. तुम्ही म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नाही; तुम्ही अत्यंत चिल्लर लोकं आहात”, असी टीका संजय राऊत यांनी केली.

कुणाला कामराच्या बाबतीत कायद्याने तुम्ही जी भूमिका घेणार असाल ती घ्यावी. पण कुणाल कामराने महाराष्ट्रात येऊ नये, हे ठरवणारे तुम्ही कोण? मर्डर करणार आहात का त्याचा, मग जाहीर करा तसं. त्यामुळे महाराष्ट्रात कंगनाला जशी सुरक्षा दिली होती. तशी कुणालला देखील दिली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले

या सर्व गल्लीतल्या टोळ्या आहेत. हे जे दाऊद इब्राहिमने पैसे देऊन कॉन्ट्रॅक्ट किलर्स नेमले होते तसे हे राजकारणातले कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत. उद्या यांच्याकडे पैसे नसतील तर यांचे कॉन्ट्रॅक्ट किलर्स दुसऱ्याकडे जातील. ज्या दिवशी सत्ता बदलेल तेव्हा हे भाडोत्री गुंड आमच्या दारात असतील, अशा शब्दात संजय राऊत यांनी मिंध्यांना फटकारले

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले फार लॉजिकल बोलतात. कुणाल कामराला पाय ठेवू देणार नाही असे म्हणतायत त्यांनी प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर बाबत काय भूमिका घेतली. राहुल सोलापूरकर बाबत काय भूमिका घेतली. ते सोडा. बेळगावात काय केले यांनी. आमची शिवसेना बेळगावात आंदोलन करतेय. या एकनाथ शिंदेचे किती लोकं मराठी लोकांच्या संरक्षणासाठी बेळगावला गेले आहेत. प्रताप सरनाईकांच्याच एसट्या तोडल्या ना, त्यांची किती लोकं गेले. आमचे शिवसैनिक जिल्हाप्रमुखांना अटका झाल्या. यांची लोकं कुठे आहेत. तिथे मराठी माणसावर अन्याय होतोय आणि तुम्हाला कुणाल कामारा, उमर खालिदची पडली आहे. बंद करा हे धंदे, असेही संजय राऊत यांनी सुनावले