
महायुतीने अमर्याद काळा पैसा, ईव्हीएम आणि प्रशासकीय यंत्रणा वापरून विधानसभा निवडणूक जिंकली आहे, या निकालावर जनतेचा विश्वासच नाही. यामुळे मिंध्यांनी ईव्हीएमचेच आभार मानले पाहिजेत, असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी हाणला.
नाशिक येथे शनिवारी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार यात्रेचा समाचार घेतला. विधानसभा निवडणुकीचे निकाल संशयास्पद असून, मतदान करणाऱ्या मतदारांचाही त्यावर विश्वास नाही. मग, हे आभार कुणाचे मानतील, चौकाचौकात ईव्हीएमच्या प्रतिकृती उभ्या करून आभार मानत फिरणार का, असा सवाल केला.
नाशिकच नव्हे तर संपूर्ण राज्याचा निकाल धक्कादायक होता, या धक्क्यातून भाजपासह मिंध्यांचे विजयीवीरही सावरलेले नाहीत. सरकारने महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी, आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत. एक निवडणूक हरल्याने पक्ष संपत नाही, खंबीरपणे पक्षाचे काम करणारे लोक स्थानिक स्तरावर असल्याने शिवसेना अनेक संकटांतून पुढे गेली आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले. यावेळी उपनेते सुनील बागुल, खासदार राजाभाऊ वाजे, राज्य संघटक विनायक पांडे, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, योगेश घोलप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हेते.
पक्षचोरीचे कांड शहांनी केले
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना स्थापन केली नाही. अमित शहा यांनी पक्षचोरीचे, आमचे चिन्ह मिंध्यांना देण्याचे कांड केले. त्यामुळे त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून फिरू नये, आपापल्या देव्हाऱ्यात अमित शहांचे फोटो लावावेत, असे सुनावले.