एकनाथ शिंदेनी स्वत:चा पक्ष स्थापन करून पाच आमदार निवडून आणून दाखवावे, संजय राऊत यांचं आव्हान

”एकनाथ शिंदे हे घाबरलेले, लाचार व्यक्ती आहेत. त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करून पाच आमदार तरी निवडून आणणून दाखवावे, असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

एकनाथ शिंदे यांना अमित शहांना लोहपुरुषाची उपमा दिली. त्यावरून संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ”एकनाथ शिंदे हे घाबरलेले व्यक्ती आहेत. लोहपुरुष जर अमित शहा आहेत तर सरदार वल्लभभाई पटेल, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कोण आहेत? हे एकनाथ शिंदे घाबरलेले, लाचार आहेत. खरी शिवसेना कोण व खोटी कोण हे अमित शहा सत्तेत नसतील तेव्हा सर्वांना कळेल. आज दहशत, दबाव, पैशांची ताकद, निवडणूक आयोग ताब्यात घेऊन तुम्ही सर्व करत आहात. एकनाथ शिंदेनी स्वत:चा पक्ष स्थापन करून पाच आमादार निवडून आणून दाखवावे. जे चिन्ह चोरलंय ते परत करावं व नवीन चिन्ह घेऊन लढवून दाखवावं. बाळासाहेबांच्या घरात घुसून तुम्ही चोऱ्या करता आणि आम्हाला अमित शहांची दादागिरी दाखवता. अमित शहा काही अमृत पिऊन आलेले नाहीत. कधी ना कधी जायचंच आहे प्रत्येकाला. तेव्हा जनता फैसला करेल, असा जोरदार घणाघात संजय राऊत यांनी केला.

माणिकराव कोकाटेंबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी संजय राठोड यांचा तत्काळ राजीनामा घेतला होता. राजीनामा का घेतला हे देवेंद्र फडणवीसांना माहित आहे. भाजपने ती मागणी केली होती. ज्यांच्यावर तुम्ही खून बलात्काराचे आरोप केले आता तेच तुमच्या मांडिवर बसलेले आहेत. कोर्टाने ज्यांना शिक्षा सुनावली आहे, भ्रष्टाचारी ठरवले आहे. त्यांच्या बाबतीत फडणवीस गप्प का? भाजप नैतिकतेच्या गोष्टी करत असते पण नैतिकता त्यांच्या आसपासही फिरकत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

”सीमावासियांसाठीच्या लढ्यात जे जेलमध्ये गेले त्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचं नाव कुठेही नाही. जस भाजपचं नाव स्वातंत्र्य लढ्यात कुठेही नाही. तसंच एकनाथ शिंदे यांचं नाव देखील सीमा लढ्यात नाही. कोणत्याही संघर्षात त्यांचं नाव नाही. सीमाभागाचा कार्यभार असताना, मुख्यमंत्री असताना देखील ते सीमाभागात कधी गेले नाही. कारण त्यांना अटकेची भिती होती, असे संजय राऊत म्हणाले.

सीमाप्रश्नावर बोलताना पुढे ते म्हणाले की, ”देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घ्यायला हवी. सीमाभागाचा विषय न्यायप्रविष्ठ आहे असे असतानाही कर्नाटक सरकार जे करतेय ते चुकीचे आहे. देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटकच्या मुख्यमत्र्यांशी बोलायला हवे”.