रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत असून महायुतीतील नेत्यांनीही यावर नाराजी व्यक्त केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्राच्या राजकीय तुळशी वृंदावनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भांगेची रोपटी लावली, असा घणाघात राऊत यांनी केला.
गुरुवारी सकाळी माध्यम प्रतिनिधींनी सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, शरद पवार हे देशाचे सर्वोच्च नेते आहेत. सदाभाऊ खोत यांच्या बापाने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना बारामतीत जाऊन शरद पवार कसे आपले राजकीय गुरू आहेत, त्यांच्या अनुभवाचा फायदा देश कसा घेतोय हे वारंवार सांगितले. किंबहुना पवारांचे बोट पकडून आम्ही कसे राजकारण केले हे मोदींनी सांगितले.
भाजप सरकारने भारतरत्न नंतरचा देशातील सर्वोच्च नागरी किताब पद्मविभूषण शरद पवारांना दिला. त्यांच्या राजकीय, सामाजिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्रातील कामाबद्दल हा किताब त्यांना देण्यात आला. पवारांनी काहीच केले नाही असे हे जे टमरेल म्हणतात त्यांनी त्यांच्या गेल्या 60-70 वर्षाच्या कामाचा लेखाजोखा पाहिला पाहिजे आणि आपण या राज्यासाठी नक्की काय योगदान दिले याचे आत्मचिंतन केले पाहिजे, असा टोला राऊत यांनी सदाभाऊ यांना लगावला.
पवारांसारखा नेते राज्याच्या नव्हे देशाच्या राजकारणातला भीष्मपितामह आहे. सदाभाऊ खोत यांनी पवारांच्या आजारपणावर अशा प्रकारचे वक्तव्य करून महाराष्ट्राची मान शरमणे खाली घातलेली आहे. फडणवीस यांनी या लायकीची माणसं महाराष्ट्रात उभी केली आहेत. या राज्याला यशवंतराव चव्हाणांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत अशा सगळ्या महान राजकारण्यांची परंपरा आहे. त्या तुळशीच्या वृंदावनांमध्ये भांगेची रोपटी देवेंद्र फडणवीस लावलेली आहे. महाराष्ट्रात विष पेरण्याचे काम सुरू आहे. कधी पडळकर, तर कधी खोत, तुमचे मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी योगदान काय? असा सवाल राऊत यांनी केला.
View this post on Instagram
लोकशाहीत टीका करायला हरकत नाही, पण हे कोणत्या नशेत असतात. सदाभाऊ खोत यांचे भाषण ऐकले तर किळस येईल. देवेंद्र फडणवीस फिदीफिदी हसत होते, टाळ्या वाजवत होते. महाराष्ट्र त्यांचा तिरस्कार करतो, तो यासाठीच. देवेंद्र फडणवीस यांनी उठून सदाभाऊ खोत यांच्या कानफडात मारायला पाहिजे होती. आम्हाला लाज वाटते की कधीकाळी तुम्ही आमच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री होतात, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. तसेच हे राज्य सुसंस्कृत, संयमी, संतांचे आणि चांगल्या राजकारण्याचे आहे. फडणवीस आणि त्यांच्या टोळीने हे राज्य खतम केले, म्हणून आम्हाला राज्यातील सत्ता बदलायची आहे, असेही राऊत म्हणाले.
राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत शहरी नक्षलवादी चालत होते असे भाष्य करणाऱ्या फडणवीस यांचा राऊतांनी चांगलाच समाचार घेतला. शहरी नक्षलवाद ही संकल्पना भाजपने आणली. भारत जोडो यात्रेत आम्हीही सहभागी झालेलो. आम्ही शहरी नक्षलवादी आहेत का? या यात्रेत अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे नेते, सामान्य नागरीक, माजी सैनिक, सैन्य अधिकारी, आयएएस, पोलीसही सहभागी झालेले. आता तुमच्याबरोबर इकबाल मिर्चीचे सहकारी दाऊद समर्पित राजकारणी आलेले आहेत ते कोण आहेत? आपण जरा आपल्या अवती भवती कोण बसलेत आंडूपांडू त्यांच्यावर बोला. डोळे तपासून घ्या, चष्मा लावा, असा सल्लाही राऊत यांनी फडणवीस यांना दिला.