महाराष्ट्रात गुंडाराज! संपूर्ण राज्याचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे, संजय राऊत यांची टीका

”अमित शहा यांनी देशाचं पोलीस स्टेट केलंय, पोलिसांच्या दबावाखाली असलेलं हे राष्ट्र आहे. पण महाराष्ट्र त्याला अपवाद आहे, कारण महाराष्ट्रात गुंडाराज आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे”, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या स्टुडिओमध्ये घडलेल्या प्रकारावर बोलताना संजय राऊत यांनी राज्यातीला कायदा सुव्यवस्थेवर वरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे.

”काल रात्री मुंबईत कुणाल कामराच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे तो म्हणजे या महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभल्याचे हे लक्षण आहे. माझं फडणवीसांना आवाहन आहे की त्यांनी गृहखातं सोडावं, त्यांना गृहखात्याचं काम झेपत नाही किंवा त्यांना काम करू दिलं जात नाहीए. बीड, परभणी, नागपूरमध्ये जे झालं ते आता तुमच्या डोळ्यासमोर महराष्ट्राच्या राजधानीत झालं. एका पॉडकास्टरचा स्टुडिओ उद्ध्वस्त केला आणि पोलीस काय झोपा काढत होते तुमचे? या महाराष्ट्रात आणिबाणी लावली आहे का? महाराष्ट्रात सेन्सॉरशिप लावली आहे का? कलाकारांना, साहित्यिकांना, कॉमेडिन्सना टीका टिपण्णी करू देणार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगावं, असे आवाहन संजय राऊत यांनी फडणवीसांना केले आहे.

”माझं फडणवीसांना आवाहन आहे की ते म्हणतात की आम्ही नागपूरच्या दंगलखोरांना सोडणार नाही व जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई दंगलखोरांकडून करू. पण काल खारमध्ये दंगलखोरांनी जे नुकसान केलं आहे त्या दंगलखोरांना तुम्ही सोडणार आहात का? जे नुकसान झालंय त्यांच्याकडून भरून घेणार आहात की नाही हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

”महाराष्ट्राच्या राजधानीत गुंडाराज चालवतायत. निवडणूकीच्या काळात सगळ्यांवर गाणी झाली मग आता एवढी सुरसुरी का आली? कशाकरता आली? हे गाणं जे आहे त्यात कुणाचा उल्लेख नाहीए. दाढीवरच्या गाण्यावर लोकं बेभानपणे नाचली. त्याचा राग आला का? तर काढून टाका तुमची दाढी. दाढीच्या उल्लेखामुळे तुम्हाला माझ्यावरच बोलतंय असं वाटत असेल तर करा सफाचट, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

” काय चाललं या राज्यात गृहमंत्र्यांना गृहखातं चालवणं झेपत नाहीए. कालच्या घटनेसाठी मुंबईच्या पोलिसांच्या आयुक्तांची बदली व्हायला हवी. मुंबई पोलिस आयुक्तांनी काय केलं. हा संपूर्ण कट दीड तास आधी रचला होता. काय करत होती मुंबई पोलीस. ज्यास पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रकार घडला त्यातील एसीपी पीआयवर कारवाई केली. संपूर्ण देशात महाराष्ट्राची नाचक्की होतेय आणि आपले मुख्यमंत्री भाषण करत फिरतायत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.