”विरोधकांना मैदानात येऊन उत्तर द्या आणि त्यांना ठोकून काढा’ अशी भाषा वापरणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. ‘देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा त्यानंतर ही भाषा करून दाखवावी. त्यानंतर ठोकशाही काय आहे हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवेल”, असा जबरदस्त इशारा संजय राऊत यांनी फडणवीसांना दिला. सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
अमित शहा यांनी पुण्यात एका सभेत बोलताना शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दात टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी अमित शहा यांचा खरपूस समाचार घेतला. ”जे वक्तव्य अमित शहा यांनी केलं आणि त्याच्यावर तिथे असलेल्या मराठी श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या. मला त्या मराठी श्रोत्यांची कीव येते. इतकी लाचारी, इतका निर्लज्जपणा. गुजरातचा एक व्यापारी नेता पुण्यात येतो व महाराष्ट्राचा अभिमान असलेले शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत घाणेरड्या भाषेत वक्तव्य करून निघून जातो. ही त्यांच्या मनाच मराठी नेत्यांबद्दल असलेली द्वेष भावन आहे. त्या द्वेषाला फुटलेली ही उकळी आहे. शरद पवारांवर ज्यांच्यामुळे भ्रष्ट्राचाराचे झालेले सुनील तटकरे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ आता अमित शहा यांच्यासोबत मांडिला मांडी लावून बसतायत. शहांच्या बाजुला अशोक चव्हाण बसले होते त्यांच्यावर अमित शहा यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलेला. याच्यांच सरकारने शरद पवार यांना देशातला सर्वोच्च दुसरा नागरी पुरस्कार पद्मविभूषण दिला होता. नरेंद्र मोदी म्हणालेले की पवारसाहेबांचं बोट धरून आम्ही राजकारणात. या सगळ्याचा अर्थ आहे की मोदी शहांमध्ये मतभेद झालेले दिसतायत, असे संजय राऊत म्हणाले.
”उद्धव ठाकरेंबाबत ते जे काही बरळलेयत. त्यांना औरंगजेब फॅन्स क्लब म्हटलं. पण आम्ही त्यांच्यासारखे जिना फॅन्स क्लबमध्ये नाही. पाकिस्तानात जाऊन जिनांच्या कबरीवर फुलं उधाळणारे नाहीय. नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाला पाकिस्तानात जाऊन केक कापणाऱ्यातले आम्ही नाही. प्रखर राष्ट्रवादी मुसलमानांची बाजू मांडणं यात काही चुकीचं नाही. या देशातल्या अनेक संघर्षाच्या काळात मुस्लिमांनी देखील बलिदान केलंय. पण महाराष्ट्राचा पराभव त्यांना जिव्हारी लागलाय. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तरिही लोकांनी भाजपचा पराभव केला. आम्ही गुजरातच्या व्यापाऱ्यांना महाराष्ट्र लुटू देणार नाही. हा संदेश लोकसभा निवडणूकीच्या निकालाने महाराष्ट्रातील जनतेने अमित शहा यांना दिला आहे. त्याचा आक्रोश ते करत आहेत, असे ,संजय राऊत म्हणाले.
”देवेंद्र फडणवीस कोणत्या प्रकारची भाषा वापरत होते. महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा. ही कुठली भाषा आहे. गृहमंत्री गुंडांची भाषा वापरत आहे. या राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. इतका पराभव तुमच्या आर पार गेलाय. आता विधानसभेत फडणवीसांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. ही भाषा महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही. अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा त्यानंतर ही भाषा करून दाखवावी. त्यानंतर ठोकशाही काय आहे हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवेल. ईडी सीबीआय पोलीस बाजूला ठेवा मग बघतो. तुमच्यात दम असेल तर ईडी सीबीआयची हत्यारं कंबरेला बांधून आमच्या अंगावर येऊ नका”, असे संजय राऊत म्हणाले.
अमित शहा व नरेंद्र मोदी विधानसभेच्या प्रचारासाठी देखील महाराष्ट्रात येतील. वैफल्यग्रस्त, निराश झालेली लोकं आहेत ही. भाजप पराभूत झालेल्या मनोवृत्तीतून बोलतोय. त्यांनी हे मान्य केलं पाहिजे. मोदी नॉन बायोलॉजिकल आहेत. ते आईच्या पोटातून आलेले नाहीत. त्यामुळे मोदी 30 वर्ष राज्य करतीलही. इतकं वैफल्य इतकी निराशा कोणत्याही राजकारण्यात पाहिलेली नाही. हरलेल्या मनोवृत्तीतून त्यांचे हे सगळं सुरू आहे. आम्ही घाबरणारे नाही. महाराष्ट्र तुमच्यासारखा गांडू नाही. तुम्ही जर आमच्या नेत्यांवर या प्रकारची भाषा करत असाल तर तुमच्या हातात सत्ता असे पर्यंत आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत. आणीबाणी काय ते तुम्ही दाखवताय, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
”फडणवीस बोलतात महाविकास आघाडीचे वीस आमदार फोडलेय.यांनी ते आमदार काय चिंचोके देऊन फोडले का? अटक करा फडणवीसंना. आमदार फोडले तर किती पैसे दिले त्यांना. 20 आमदार फोडल्याचे ते गर्वाने सांगतात त्यांची चौकशी करावी. फडणवीस शिंदे अजित पवारांनी हे पैसे आणले कुठून याची तुम्ही चौकशी करा. यांनी 50 कोटी प्रत्येक आमदाराला दिले आहेत. जर यांना भ्रष्टाचार नको आहे तर अमित शहांनी फडणवीस यांच्या वक्तव्यावर ईडी चौकशी लावावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.