अधिवेशन कुचकामी करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जाईल, संजय राऊत यांची टीका

महाराष्ट्राच्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार झाला. आमदारांनी मंत्रीपदाची शपथ जरी घेतली असली तरी अद्याप कोणते खाते कोणाकडे याबाबत काहीच सांगण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटपाला आणखी दोन ते तीन दिवस लागणार असल्याचे सांगितले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. ”खातेवाटप झालेले नसल्यामुळे अधिवेशन कुचकामी करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जाईल”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

”हे बिन खात्याचं सरकार आहे. मुख्यमंत्री आहेत पण त्यांच्याकडे कोणती खाती ते कुणी सांगू शकत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत त्यांच्याकडे कोणतं खातं आहे ते सांगता येत नाहीए. एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत तर सगळी बोंब आहे. जवळपास निकालानंतर एक महिन्याने मंत्रीमंडळाने शपथ घेतल्या. शपथ घेतल्यानंतर तासा दीड तासात खातेवाटपाची यादी जाहीर होते. आज अधिवेशन आहे. अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास असतो. कोणी कोणत्या खात्याची उत्तरं द्यायची. की सगळ्याचा खात्याची उत्तरं फडणवीस देणार आहेत. सरकारमध्ये मंत्रीमंडळात राज्य चालवण्याच्या बाबतीत गोंधळ दिसतोय. या सरकारकडून अधिवेशन कुचकामी करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण विरोधक तसं होऊ देणार नाही. राज्यात असंख्य प्रश्न आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. विरोधक प्रश्न विचारतील. ईव्हीएमच्या कृपेने विरोधकांची संख्या कमी असली तरी ते ताकदीचे आहेत. आदित्य ठाकरे, भास्कर जाधव , नाना पटोले, जयंत पाटील, रोहीत पवार ही ताकदीची माणसं विधानसभेत आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.