वेष पालटून काय फिरताय, तोंड दाखवायला लाज वाटते का? संजय राऊत यांचा खणखणीत टोला

दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीसाठी मी वेष बदलून विमानातून प्रवास केला असा खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी गद्दार गटांना व भाजपला फटकारले आहे. ”अजित पवार वेष पालटून दिल्लीत फिरायचे. एकनाथ शिंदे काळी दाढी पांढरी करून फिरत राहिले. देवेंद्र फडणवीस वेष पालटून फिरतात… यांना स्वत:चे तोंड दाखवायला लाज वाटते का? वेष पालटून काय फिरताय, तोंड दाखवायला लाज वाटते का? अशा शब्दांत संजय राऊत यांनी त्यांचा समाचार घेतला.

सोमवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपात तथ्य असून त्यांच्याकडे आलेल्या समित कदम याला गृहमंत्रालयाने Y दर्जाची सुरक्षा का दिली आहे असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला. ”महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ अनिल देशमुख यांनी जो खुलासा केला आहे की त्यांना फडणवीसांनी एक मध्यस्थ पाठवला. अनिल देशमुख यांना मिरजेचा एक लायझनिंग करणार समित कदम नावाचा माणून भेटला. त्या मध्यस्थाने सांगितले की आम्ही तुम्हाला तीन प्रतिज्ञापत्र देतो त्यावर सह्या करा तरच तुम्हाला अटक करणार नाही. सदर सद्गृहस्थ अनिल देशमुखांना भेटत राहिला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार यांच्यावर आम्हाला हवे ते आरोप करा. ते जर तुम्ही केले नाही तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. अशा प्रकारची धमकी त्यांना देण्याचं काम फडणवीसांनी केलं. मी त्यांना यासाठीच खलनायक म्हणतो. ते या राज्याच्या राजकारणातील खलनायक आहेत. हा सर्व प्रकार गंभीर आहे. राजकीय दबावाला जे झुकले नाही ते तुरुंगात गेले, जे झुकले दे भाजपसोबत गेले. फडणवीस टोळी म्हणेल की आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही. समित कदमला आम्ही ओळखत नाही. तुम्ही ओळखत नाही मग त्या समित कदमला व्हाय दर्जाची सुरक्षा का आहे. गृहमंत्र्यांनी त्यांना ही सिक्युरिटी का दिली? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला. तसेच संजय राऊत यांनी फडणवीस व समित कदम यांचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवले.

जसं अनिल देशमुख यांच्यासोबत झाले तसेच माझ्यासोबतही झालेले. त्याबाबत मी वैंकय्या नायडू यांना पत्र लिहलं होतं. त्यावेळी मला सतत माणसं भेटायला येत होती व धमक्या देत होती. हे सगळं रेकॉर्डवर आहे. संघ परिवारातील लोकं कशी येतात व आधी समजवतात. आपण त्यांचं ऐकलं नाही. मग धमक्या देतात. असं सगळं सांगून ते तुम्हाला तुमच्याकडे ओढून घेतात. अनिल देशमुख यांच्या बोलण्यात तथ्य आहे. तुरुंगातही ते माझ्याशी बोललेले आहेत. मी सुद्धा या अनुभवातून गेलो आहे, असे संजय राऊत म्हणाले.

”प्रफुल पटेल यांच्यावर ईडीची कारवाई झाली. दाऊदशी संबंध आहे म्हणून त्यांची दीडशे कोटींची प्रॉपर्टी जप्त झाली. भाजपसोबत गेल्यावर त्यांची प्रॉपर्टी त्यांना परत मिळाली. अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्यात त्यांचं नाव येतं. पक्ष बदलताच आदर्श घोटाळा स्वच्छ होतो. ईडीची कारवाई केली त्या भावना गवळी विधानपरिषदेवर आल्या. त्यामुळे अनिल देशमुख सांगताहेत ते सत्य आहे. महाराष्ट्रातील कायदा व सुरक्षा व्यवस्था ढासळलेली आहे. विरोधकांना खोट्या प्रकरणात अडकवणं किंवा तुरुंगात टाकण्यासाठीच व स्वत:च्या पक्षाच्या गुंड़, लफंगे, चोरांना संरक्षण देण्यासाठी फक्त गृहमंत्रालयाचा वापर होतोय.फडणवीसांनी ज्यांना ज्यांना संरक्षण दिलंय त्यांच्यावर खटले आहेत. यादी काढा. एकनाथ शिंदे गटात एखाद्या गटनेत्याने जरी प्रवेश केला तरी त्याला संरक्षण मिळतं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.